आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात असलेल्या रत्नागिरी पालिकेवर आणखी एका अपूर्ण कामाचा महिन्याचा सुमारे २ लाखांचा भुर्दंड पडत आहे. नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठीच्या ११०० मीटरच्या पाईपलाईनचे काम गेली ३ वर्षे अर्धवट आहे. हे काम अर्धवट असल्याने जॅकवेलमध्ये पाणी टाकण्यासाठी लावण्यात आलेल्या ६ फ्लोटिंग पंपांचे महिन्याला २ लाख रुपये वीजबिल येते. गेल्या तीन वर्षांत बिलापोटी ७२ लाखांचा खर्च झाला आहे. हा खर्च टाळण्यासाठी नव्या सत्ताधाऱ्यांनी अपूर्ण असलेले ६११ मीटरचे काम करून घेतल्यास पालिकेवरील हा भुर्दंड कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे सत्ताधारी या पावसापूर्वी तरी हे काम पूर्ण करून घेणार का, असा प्रश्न आहे. शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून ६ फ्लोटिंग पंप बसवण्यात आले. सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे ११०० मीटरची पाईपलाईनचा समावेश आहे; परंतु ३ वर्षे झाली तरी ही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.
पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली तर शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. यामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शीळ धरण ते जॅकवलेपर्यंत नैसर्गिक उताराने पाणी येते. पालिकेने सुमारे ११०० मीटरची ही पाईपलाइन वेळीच टाकली असती तर पालिकेला भुर्दंड बसला नसता. सहा फ्लोटिंग पंप नदीवर बसवून ते पाणी जॅकवेलमध्ये टाकले जाते. यासाठी सहापैकी ४ पंप २४ तास सुरू असतात. दोन पंप पर्यायी म्हणून ठेवलेले असतात. या विद्युतपंपांचे महिन्याचे वीजबिल सुमारे २ लाख आहे. गेली तीन वर्षे हे पंप सुरू आहेत म्हणजे आतापर्यंत साधारण पाऊण कोटी रुपये पालिकेने बिलापोटी मोजले आहेत. पाईपलाईन टाकली असती तर जनतेचे पैसे वाचले असते; परंतु यामध्ये कोणालाही रस नाही आणि कोणाची मानसिकताही नसल्याचे दिसते.
साधारण ३ वर्षे व्हायला आली तर ११०० मीटरपैकी आतापर्यंत ४९९ मीटरचे पाईप टाकून झाले आहेत. उर्वरित ६११ मीटरचे काम शिल्लक आहे. त्याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. हे काम अपूर्ण असल्याने फ्लोटिंग जेटीचे पंप सुरू आहे. पंप सुरू असल्याने विद्युतबिलाचा बोजा पालिकेवर पडतच आहे. त्यामुळे जनतेचे नाहक वाया जाणारे हे पैसे वाचण्यासाठी पालिकेने यावर्षी तरी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. पालिकेवर आता शिवसेनेची नवी सत्ता प्रस्थापित झाली आहे. पालिकेची परिस्थिती नाजूक आहे. सुमारे ४३ कोटींचा पालिकेवर बोजा आहे. या परिस्थितीत फ्लोटिंग पंपांचे दोन लाख रुपये पालिकेला मोजावे लागत आहेत. पाईपलाईन टाकण्याचे हे काम पूर्ण झाल्यास पालिकेचा दर महिन्याचा २ लाखांचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे नवे सत्ताधारी याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.
पावसाळ्यात फ्लोटिंग पंपांना बांधण्याची वेळ – फ्लोटिंग पंप पावसाळ्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता असते. असा प्रसंग ओढू नये म्हणून फ्लोटिंग पंप बांधून ठेवण्यात आले आहेत. पाईपलाईन टाकून अर्धवट काम पूर्ण केल्यास ही सर्व समस्याही दूर होणार आहे.

