कोकणकरांना आता मुंबईतून कोकणात थेट रो-रोद्वारे जाता येणार आहे. ही रो-रो सेवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड व तिथून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग अशी रो-रोची सेवा असणार आहे. या रो-रो फेरीचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे २५ नॉट्स असेल. रो-रो फेरीमुळं ४० वर्षानंतर कोकणात जलवाहतूक सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बोटीची जयगड आणि विजयदुर्ग येथे यशस्वी चाचणी झाली होती.मुंबईतून रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागतात. मात्र रो-रो सेवेमुळं तुम्ही हा प्रवास तीन तासांत व पाच तासांत पूर्ण करु शकता.
भविष्यात या रों रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील, अशी माहिती समोर येतेय. त्यामुळं कोकणात जाणे सोप्पे होणार आहे. इकोनॉमी क्लाससाठी २,५०० रुपये, प्रीमियम इकोनॉमीसाठी ४,००० रुपये तर, बिझनेस क्लाससाठी ७,५०० रुपये, फर्स्ट क्लाससाठी ९००० रुपये इतके तिकीट ठेवण्यात आले आहेत.