मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या रत्नागिरी शहराजवळील टीआरपी, कुवारबाव, मिरजोळे, रेल्वेस्टेशन फाटा या परिसरात महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तेथील नागरिकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, ठेकेदाराने धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही केली जात आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत काही भाग सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत आहे; मात्र, वाहतुकीसाठी जुनाच रस्ता वापरला जात आहे. त्यावरून अवजड वाहने व रस्तेकामासाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री नेणारी वाहने ये-जा करत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे माती सुकलेली आहे. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून, शेजारील निवासी वस्त्या, दुकानदार यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळाही असल्याने विद्यार्थ्यांनाही धुळीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. धूळ कमी करण्यासाठी दिवसातून किमान तीन ते चारवेळा पाणी मारणे आवश्यक असून, व्यापारी संघटनेने या संदर्भात संबंधित यंत्रणेला वारंवार सूचना दिल्या आहेत. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. भविष्यात प्रदूषण व आरोग्यविषयक समस्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि ठेकेदार लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जयस्तंभ-माळनाका मार्गवरही त्रास – रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते माळनाका या रस्त्यावरही धुळीचे साम्राज्य आहे. या मार्गावरील एका बाजूचे काँक्रिटीकरण झालेले नाही. त्या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून, सर्वत्र खडी वर आली असून खालील रस्ता दिसू लागला आहे. त्यामुळे खड्डेही पडले आहेत. ट्रक, एसटी, मोटार गेल्यानंतर उडणारी धूळ पादचारी, दुचाकीस्वारांच्या डोळ्यात आणि अंगावर उडत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. नगरपालिका आणि लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

