21.1 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरी शहरातील रस्त्यांची सोशल मीडियावर खिल्ली

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची सोशल मीडियावर खिल्ली

दरवर्षी दर्जाहीन रस्त्यांचीच कामे करून नागरिकांचा पैसा वाया घालवायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया आहे.

रत्नागिरीकरांनो, तुमच्या सहनशीलतेला सलाम’ या मथळ्यावर रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमध्ये गेलेल्या रस्त्यांवर काही नागरिकांनी सोशल मीडियावर उपहासात्मक टीपण्णी करून पालिका आणि लोकप्रतिनिधींना कोपरखळी हाणली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाच एवढी वाईट झाली आहे की, एकही रस्ता चांगला राहिलेला नाही. सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना नागरिक, वाहनधारक अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत, इतका संताप आहे. मलमपट्टी बंद करून पालिकेने गणेशोत्सवाच्या आधी हे खड्डे काँक्रिटने भरावेत, अशी जनतेची मागणी आहे. शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेने नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहे. शहरातील अंतर्गत प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था, त्यावर साचलेली खडी, उखडलेले डांबरीकरण आणि पावसामुळे रुंदावलेले खड्डे या सर्व परिस्थितीमुळे रत्नागिरीतील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

मारुती मंदिर, जयस्तंभ, मारुती आळी, रामआळी तसेच माळनाका ते सिव्हिल हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, भुतेनाका, काँग्रेस भवन, लक्ष्मीचौक आदी मार्गांवरील रस्त्यांची अवस्था इतकी खराब आहे की, दुचाकी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या या रस्त्यांवर खडी, दगड वर आले आहेत. कोणत्याही क्षणी होण्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. मे महिन्यात रस्त्यांचे डांबरीकरण झाले; पण ते किती टिकले ? आता या रस्त्यावरून जाताना वाटते की, पुन्हा पूर्वीचे रस्तेच बरे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामालाही तात्पुरता ब्रेक लागला आहे. पावसानंतर ते सुरू होण्याची शक्यता आहे; परंतु तोंडावर गणेशोत्सव आहे. त्यापूर्वी तरी शहरातील खड्ड्यात गेलेले रस्ते पालिकेने सुस्थितीत करावे, अशी मागणी नागरिक आणि गणेशभक्तांची आहे.

नागरिकांचे सत्ताधाऱ्यांना साकडे आहे की, त्यांनी प्रत्यक्ष या रस्त्यां वरून चालत फेरफटका मारावा आणि सामान्य नागरिकांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, हे स्वतः अनुभवावे. नगरपालिकेने या खड्ड्यांमध्ये फक्त जांभ्या दगडांची भर घालून थातूरमातूर काम न करता काँक्रीटद्वारे रस्त्यांचे सुयोग्य आणि टिकाऊ पुनर्बाधणी करावी, अशी मागणी होत आहे. पावसाचे कारण, दर्जाबाबत मौन दरवर्षी पालिका आणि लोकप्रतिनिधी अतिवृष्टीचे कारण पुढे करतात. मग अतिवृष्टी लक्षात घेऊन रस्ते का होत नाहीत? पांगरी-देवरूख मार्गाचे काम करून पाच वर्षे झाले अजून त्याला एवढ्या पावसांमध्ये खड्डे नाहीत. मग रत्नागिरी शहरातील रस्ते मे महिन्यात करून देखील पावसात दोन महिन्यात का वाहून जातात? दरवर्षी दर्जाहीन रस्त्यांचीच कामे करून नागरिकांचा पैसा वाया घालवायचा का, अशी संतप्त प्रतिक्रिया आहे.

संतापाचा सूर – सध्या सोशल मीडियावर अनेक नागरिक आपल्या अनुभवांचा सूर जाहीरपणे मांडू लागले आहेत. एकीकडे रत्नागिरीसारख्या ऐतिहासिक व पर्यटकप्रिय शहराची अशी दुरवस्था बघून मनस्ताप होतो तर दुसरीकडे नागरी सहनशीलतेचा चमत्कारिक धीरही जाणवतो; पण हा धीर किती दिवस टिकणार ? शासन आणि प्रशासनाने आता तरी या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular