दिवाळीमुळे बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. विक्रेत्यांनीही रस्त्यालगत विक्रीचे स्टॉल मांडलेले आहेत. बाजारपेठेतील गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यालगतच्या विक्रेत्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर नियंत्रण ठेवताना पोलिसांची दमछाक होत आहे. कपडे, सोने, सजावटीच्या वस्तू, आकाशदीवे, पणत्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये तर दुपारनंतर लांबचलांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ज्या दुकानांमध्ये विशेष सवलत आहे, तिथे तुडुंब गर्दी दिसत आहे. शहरातील मोठ्या शोरूमपासून लहान दुकानांमध्येही नागरिकांचा ओघ कायम आहे. याशिवाय रस्त्यावरील विक्रेत्यांकडे खरेदी करणारा वर्गही तितकाच आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही बाजारपेठेत गर्दी होती. एकीकडे लक्ष्मीपूजनाची दुकानदारांची गडबड आणि दुसरीकडे ग्राहकांना सांभाळण्याची कसरत सुरू होती. सोने महागले असले तरीही सराफ पेढ्यांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. दिवाळी आणि लग्न सराईमुळे सोने खरेदी तेजीत आहे. बाजारपेठेमध्ये पूजेसाठी लागणारी फळे, कारीट, आंब्याची पाने, शेवंती, झेंडूची फुले यांची आवक वाढली असून, ठिकठिकाणी ग्रामीण भागातील विक्रेते हे साहित्य घेऊन बसले आहेत. चिपळूण शहरात ग्रामीण भागासह इतर तालुक्यांतील ग्राहकही खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणारी गर्दी रात्री ९.३० पर्यंत कायम असते.
बाजारपेठेत कोटींची उलाढाल – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. गेल्या चार दिवसांत सजावटीचे साहित्य, किल्ल्यांवरील सैनिक, कपड्यांची खरेदी या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच साडेतीन मुहूतपैिकी एक असलेल्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या मुहूर्तासाठी नवीन वस्तू, वाहन, सोने खरेदीचे नियोजनही करण्यात आले आहे.

