कोणीही यावे… फूटपाथवर मुक्काम ठोकत रत्नागिरीकरांना लुटून पळावे… रत्नागिरीत परप्रांतातील संशयितांच्या हालचाली वाढत असताना पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच एमआयडीसीत भरदिवसा जबरी चोरी झाल्याचे समोर येत आहे. कोणी अटकाव केला तर अंगावरच कपडे उतरवत विवस्त्र होण्याचा नवा फंडा त्या वापरत असल्याने त्यांना पकडायचे तरी कसे? अशी समस्या निर्माण झाली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच रत्नागिरीत भर दिवसा परप्रांतीय महिलांनी घरात घुसून दरोडा घातला. पाच ते सहा महिला मुलाबाळांना घेऊन घरात शिरल्या. रोटी मागण्याच्या बहाण्याने घरात जावून मारहाण करीत घरातील दागिने लांबविले. राजस्थानच्या राहणाऱ्या या महिलांचे कारनामे लवकरच उघड होणार आहेत.
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. मोठमोठे शोरूम, कारखाने, छोटेमोठे उद्योग या परिसरात आहेत. मात्र याच परिसरात रेकी करून राजस्थानी महिलांनी दरोडा घातल्याने ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रत्नागिरीत आजच्याघडीला मोठ्या प्रमाणात संशयास्पद फिरणारे परप्रांतीय रस्तोरस्ती पहायला मिळत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज एमआयडीसीत जी घटना घडली तशा प्रकारचे करण्याचे धाडस या परप्रांतीय संशयितांना मिळाले आहे.
हमे रोटी दो – एमआयडीसीतील बंदरकर गॅरेजशेजारी श्रीमती कल्पना भिसे यांच्या मालकीचे कॉन फूड व्यवसायाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये भिसे यांच्या मुलाकडे कामाला असलेल्या काही तरूणी आपले दैनंदिन काम करीत होत्या. याचवेळी चार-पाच महिला अचानक गोडावूनमध्ये घुसल्या आणि हमे रोटी दो असे बोलू लागल्या.
मोबाईल उचलले – भिसे यांच्याकडे काम करणाऱ्या मुली आपल्या ग्राहकांना संपर्क साधत असतात. त्यासाठी त्या मुलींना मोबाईल दिले होते. काही मुली जेवण झाल्यानंतर गोडावूनबाहेर आल्या होत्या तर त्यातील एक मुलगी त्या ठिकाणी बसली होती. अचानक या महिला घुसल्यानंतर त्या तरूणीची घाबरगुंडी उडाली. याच दरम्यान त्यातील एका महिलेने टेबलवरचा मोबाईल उचलण्याचा प्रयत्न केला.
मम्मी, मम्मी ओरडू लागली – भिसे यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व मुली श्रीमती भिसे यांना आदराने मम्मी म्हणतात. त्यानुसार घाबरलेल्या त्या तरूणीने भिसे यांना आवाज देत बाहेर बोलावून घेतले. भिसे या बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या संशयित महिलांना हॉलबाहेर येण्याची विनवणी केली.
जेऊ घालते, बाहेर या – यावेळी कमरेवर मुले घेऊन हॉलमध्ये घुसलेल्या त्या महिला रोटी दो, रोटी दो असा आवाज देत होत्या. यावेळी भिसे यांनी मी सर्वांना जेऊ घालते, तुम्ही हॉलच्या बाहेर जावून बसा असे सांगितले. मात्र याचवेळी त्यातील काही महिलांनी नजर चुकवून भिसेंच्या बेडरूममध्ये प्रवेश केला.
दागिने लांबविले – एकीकडे हॉलमध्ये झटापट सुरू होती तर दुसरीकडे बेडरूममध्ये हातसफाई सुरू झाली होती. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, एक अंगठी आणि मोत्याचे दागिने त्यातील काही संशयित महिलांना चोरले. त्या बेडरूमच्या बाहेर आल्या. यावेळीदेखील या संशयित महिलां श्रीमती भिसे यांना ढकलाबुकल करत होत्या.
मुलाला कॉल केला – भिसे यांचा मुलगा, सून व मुलगी हे सारेजण नव्याने बांधत असलेल्या बंगल्याकडे गेले होते. याचवेळी कामावर असलेल्या एका मुलीने भिसे यांच्या मुलाला फोन केला व घडलेली घटना सांगितली. ही माहिती मिळताच भिसे यांचा मुलगा घराकडे धावला.
रस्त्यात अडवले पण…. – घरातून हातसफाई केल्यानंतर या महिलांनी बाहेरचा रस्ता पकडला. आपल्या मुलाबाळांना घेऊन घटनास्थळावरून धूम ठोकली. ज्या दिशेने या महिला पळाल्या त्याची माहिती त्यांच्या मुलाला देण्यात आली. त्या महिलांना त्यांनी रस्त्यात अडवले. मात्र पुढे जे काही घडले ते फारच भयानक होते.
अंगावरील साडीच सोडली – चोऱ्या करणाऱ्या परप्रांतीय महिलांनी आता नवा फंडा अंमलात आणला आहे. त्यांना रस्त्यात अडवल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. भिसे यांची सून, मुलगी आदींनी त्यांना आमच्या घरात का शिरला होतात, काय काय चोरून आणले ते दाखवा अशी विचारणा करताच त्यातील एका महिलेने अत्यंत घाणेरडी शक्कल लढवून अंगावर परिधान प केलेली साडी व सर्व वस्त्रे भर रस्त्यात उतरवली आणि साऱ्यांनाच शरमेने मान खाली घालायला लावली.
निचपणाचा कळस – या टोळीतील सर्व महिला या भलत्याच ‘पोहोचलेल्या’ होत्या. एकीने अंगावरील सर्व वस्त्रे उतरवली व ती १०० ते १५० मीटर के धावत पुढे गेली. आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी त्या महिलांना तिथून जावू दिले आणि तात्काळ पोलिसांना त्याची खबर दिली.
ऊसाचा रस घोटला – मोठा कारनामा करून बाहेर पडलेल्या त्या महिला चालत चालत रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळाल्या. टीआरपी येथील ब्रिजवर आल्यानंतर त्यांनी ऊसाचा रस विकत घेतला. मनसोक्त रस घोटल्यानंतर त्या रेल्वे स्टेशनवर जावून पोहोचल्या.
‘मांडवी’ने पळाल्या – चोरी करून रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या महिला नुकत्याच प्लॅटफॉर्मवर आलेल्या मांडवी एक्स्प्रेसकडे धावल्या. या ट्रेनमध्ये बसून त्या गोव्याकडे पळून गेल्या. एक रूम भरेल इतकी बोचकी त्यांच्याकडे होती.
थिवीमला पकडले – रेल्वे स्टेशन येथून सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यानंतर त्या महिला मांडवी एक्स्प्रेसने गोव्याला गेल्याचे दिसून आले. याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. थिवीम रेल्वे पोलिसांनी तपासणीसाठी ही गाडी थांबवली आणि त्या संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.
दागिने हस्तगत झाले नाहीत – अटक केलेल्या त्या महिलांना रत्नागिरीत आणण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र त्या महिलांनी आम्ही चोरी केलीच नाही असा पवित्रा घेतला. अद्यापही भिसे यांच्या घरातून चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केलेले नाहीत. हे ग्रामीण पोलिसांची अपयश म्हणायचे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकीकडेच आधार कार्ड – पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या महिलांपैकी एका महिलेकडेच आधार कार्ड मिळाले आहे. बाकीच्या महिलांबाबत योग्य ती माहिती मिळत नाही. त्यांची माहिती मिळवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी राज्यातील इतर पोलीस स्थानकांना त्या महिलांबाबत माहिती पुरवली आहे.
फूटपाथ कोणासाठी ? – रत्नागिरीत रेल्वे स्टेशनपासून अगदी रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी फूटपाथ आहेत. हे फूटपाथ परप्रांतातून चोऱ्या करण्यासाठी रत्नागिरीत आलेल्यांसाठी आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस वेळीच कारवाई का करीत नाहीत? आज शहरात ठिकठिकाणी भीक मागण्याच्या बहाण्याने अनेक परप्रांतीय संशयित फिरत असल्याचे चित्र राजरोसपणे पहायला मिळत आहे.