तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील मोरया चौकातील पिकअप् शेडचे छप्पर वेगवान वाऱ्यामुळे उडाले आहेत. छपराचे अन्य पत्रे गंजलेले असून ते खाली पडण्याची शक्यता आहे. ही पिकअप् शेड गेल्या काही वर्षांपासून विनावापर आहे. उडालेले पत्रे लोंबकळत तिथेच असून ते वेळीच बाजूला काढा कारण, पर्यटकांसाठी धोका पोचू शकतो. अन्यथा आम्हाला पिकअप् शेड जमीनदोस्त करावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, उमेश भणसारी यांनी दिला आहे. बाराव्या वित्त आयोगातून पिकअप् शेड उभारणी करण्यात आली होती.
गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन मुख्य विभाग महामंडळाच्या (एमटीडीसी) प्रवेशद्वारासमोर एसटी महामंडळाचा प्रवासी थांबा (पिकअप् शेड) आहे. तेथे पर्यटकांना उभे राहता यावे यासाठी ती बांधण्यात आली होती. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात एसटी महामंडळाच्या गाड्यांनी येणाऱ्या भक्त व पर्यटकांना गणपती मंदिराजवळ उतरता यावे, या दृष्टीने ही पिकअप् शेड बांधण्यात आली होती; परंतु आजतागायत ती पिकअप् शेड वापरात आलेली नाही. या शेडची दुरवस्था झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात वेगवान वाऱ्यामुळे पूर्णतः छप्पर उडाले आहे. गंजून सडलेले पत्रे खाली पडले आहेत. शिल्लक पत्रे भविष्यात पूर्णपणे खाली पडण्याची शक्यता आहे.
गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मोरया चौकात ही पिकअप् शेड असल्याने अनेक भक्त व पर्यटकांना धोका पोहचू शकतो. एमटीडीसी व स्थानिक प्रशासनाकडून या पिकअप शेडच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही शेड काढून तिथे अन्य सुविधा उपलब्ध करून देता येईल; मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. सध्या या शेडच्या मागील बाजूस भक्त पर्यटकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था असल्याने अनेक गाड्या या ठिकाणी व शेडच्या समोरच लावल्या जातात. शेडच्यासमोरच स्थानिक रिक्षा व्यावसायिकांचे रिक्षा स्टॅन्ड आहे. या रिक्षाचालक व्यावसायिकांकडून या शेडचा वापर बसण्यासाठी केला जातो. अनेक पर्यटकही विश्रांतीसाठी पिकअप् शेडमध्ये बसलेले दिसून येतात.