समाजातील बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अंतर्गत पहिलीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, कोरोना काळामुळे प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने पालकांना दि. ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून पहिली वर्गासाठी मोफत प्रवेश मिळण्यासाठी ९३५ अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झाले होते. त्यात ऑनलाईन लॉटरी प्रणालीने ६०९ विद्यार्थ्यांची प्रवेशाकरिता निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे लॉटरी प्रणालीने प्रवेशाकरिता पात्र ठरलेल्या पालकांना, निवड झालेल्या शाळेमध्ये प्रत्यक्षात प्रवेश घेण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत दिली गेली होती. मात्र, दि.३० जूनपर्यंत खूपच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शालेय स्तरावर प्रत्यक्षात ऑनलाईन प्रणालीच्या सहाय्याने प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी सतत उद्भवत असणाऱ्या तांत्रिक समस्येमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राप्त होणाऱ्या ओटीपी कोड जनरेट व्हायला तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने, निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून प्राथमिक विभागाचे पुणे विभागीय संचालक डी.जी.जगताप यांनी ऑनलाईन प्रणालीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढीचे लेखी आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. पालकांना यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. निवड यादीत नाव असलेले परंतु प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एक संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पालकांनी त्वरित कागदपत्रांची पुर्तता करून प्रवेशासंबंधी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

