रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सभेत प्रशासनाच्या मागील ४ वर्षाच्या कामकाजावर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्यासह सभापती आणि सदस्यांनी जोरदार टीका केली. विरोधी नगरसेवकांनीही प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप नोंदविले. रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच झाली. ३२ पैकी २९ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे घवघवीत यश शिवसेना-भाजप महायुतीला मिळाले. या पार्श्वभुमीवर पहिल्याच सभेत सत्तारूढ नगरसेवकांनी प्रशासनाच्या मागील ४ वर्षांच्या काम काजावर टीका केली. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या शौचालय दुरूस्तीच्या खर्चामध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. अनेक कामे ५ लाखांच्या आत असल्याचे दाखवत प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याचे उपनगराध्यक्षांनी सांगितले. प्रशासनावर त्यांनी सडकून टीका केली. पाणी सभापती निमेश नायर यांनी देखील महानगर गॅस कंपनीच्या खोदाईवर आक्षेप घेत ३० लाख रूपये कमी घेण्यात आल्याचा गंभीर आरोप सभेमध्ये केला. हे पैसे का कमी घेतले याचे उत्तर मागवावे अशी मागणी त्यांनी केली.
भाजपचे गटनेते राजेश तोडणकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत असे सांगत ते वेळेवर देण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली. शिवसेनेचे नगरसेवक सौरभमलुष्टे यांनी रत्नागिरी नगर परिषदेतील आर्थिकस्थिती चांगली नसल्याने आपल्याला बैठकीचा भत्ता नको अशी घोषणा केली. त्यानंतर राजीव कीर यांनीही सभेमध्ये चहापान बंद करावे अशी मागणी केली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाबाबत किती खर्च झाला याचा हिशोब मांडत कुत्र्यांची संख्या कमी का होत नाही असा प्रश्न ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटने यांनी उपस्थित केला. प्रशासनाच्या कामकाजाची आणि सदस्यांनी जे आरोप केले आहेत त्या कथित घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल असे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. चर्चेमध्ये नगरसेवक बंटी कीर, स्वच्छता सभापती बाबा नागवेकर, सौ. वर्षा ढेकणे, विजय खेडेकर यांनी देखील सहभाग घेतला.
यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सभेमध्ये दरम्यान नगर परिषदेचा अभियंता यत्तिराज जाधव झाली. त्याबाबत येत्या आठवडाभरात विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे नगर परिषद ठराव करू शकते. अंमलबजावणी नगरविकास संचलनालय करते. संबंधित विषयात नियमानुसार चौकशी समिती गठीत करता येईल असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दरम्यान महानगर गॅस कंपनीच्या खोदाईबाबत कमी पैसे घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याच संदर्भात या कंपनींचे संचालक अमोल शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता नगर परिषदेने आपणाला जो खर्च सांगितला ‘आणि बील दिले त्याप्रमाणे आम्ही रक्कम भरणा केली अशी माहिती दिली. तर नगर अभियंता यतिराज. जाधव यांनी आपण आकारलेला कर आणि जमा केलेला महसूल हा नियमाप्रमाणे आहे. कोणताही कमी पैसा घेतलेला नाही असे पत्रकारांना सांगितले.

