जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी इच्छूक उमेदवारांची झुंबड उडाली. या निवडणूकीसाठी ९ जिल्हा परिषद गटासाठी १७ तर पंचायत समितीच्या १८ गणांत २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार तसेच शिवसेना भाजप युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बुधवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी काही ठिकाणी बंडाचे निशाण फडकवले जाण्याची शक्यता आहे. नगरपरिषद निवडणूकीत यश मिळाल्यानंतर शिंदे सेना आणि भाजप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी तितकीच सक्रीय झाली आहे.
मंगळवारी ढोल ताशाच्या गजरात व घोषणाबाजी करत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विशेषतः शिंदेसेना व भाजपमध्ये अधिक जोश पहायला मिळाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील सनईबाजा वाजवत उमेदवारी अर्ज दाखल केले. यानिमीत्त येथील प्रांत कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक देखील काहीक्षण ठप्प झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांमार्फत ही कोंडी सोडवण्यात आली.
जि.प.साठी १७ अर्ज दाखल – तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटासाठी कळवंडे, पेढे व शिरगांव गटात प्रत्येकी १, तर खेर्डी, अलोरे, उमरोली, वहाळ या चार गटात प्रत्येकी २ अर्ज, तसेच सावर्डे व कोकरे गटात प्रत्येकी ३ असे एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती गणासाठी कळवंडे, खेर्डी, वेहेळे, शिरगांव, मांडकी, निवळी, वहाळ, कोकरे, कुटरे येथे प्रत्येकी १, तसेच भोम, पेढे, दळवटणे, अलोरे, पिंपळी खुर्द, सावर्डे, गुढे येथे प्रत्येकी २ आणि उमरोली गणात सर्वाधिक ३ उमेदवारी असे एकूण २६ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे कापसाळ गणात अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
माजी पदाधिकारी पुन्हा मैदानात – या निवडणूकीच्या निमीत्ताने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी माजी पदाधिकारी निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. यामध्ये माजी सभापती पूजा निकम, धनश्री शिंदे, सुरेश खापले, जितेंद्र चव्हाण, विनोद झगडे, तर माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, शरद शिगवण, युवराज राजेशिर्के, संतोष चव्हाण आणि माजी सदस्य दिशा दाभोळकर, नितीन ठसाळे यांचा समावेश आहे.

