सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील वाघीण एस. के. टी. ०२ गेल्या दशकभरात संपूर्ण सह्याद्री-कोकणपट्ट्यातील वाघांच्या वंशवृद्धीचा पाया बनली आहे. तिच्या पिल्लांनी व नातवंडांनी आता स्वतंत्र अधिवास तयार केला असून, ही वाघीण ‘सह्याद्रीची जननी’ म्हणून ओळखली जात आहे. ताडोबा, अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात असलेल्या मादी वाघांनी वाघांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे या संदर्भात माहिती देताना म्हणाले, एस. के. टी. ०२ सह्याद्रीच्या वाघवंशाची आधारस्तंभ ठरली आहे. या वाघिणीचे पहिले कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे दर्शन २०१४ मध्ये वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट टीमने घेतले. तिने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये पिल्लांना जन्म दिला असल्याची नोंद आहे.
तिच्या पिल्लांपैकी एस. के. टी. ०४ आणि एस. के. टी. ०७ या माद्या आता प्रौढ झाल्या असून, एस. के. टी. ०४ ही वाघीण २०२४ मध्ये तीन पिल्लांसह सह्याद्रीच्या जंगलात दिसून आली. एस. के. टी. ०७ ही वाघीण २०२१ मध्ये गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळली. २०२३ मध्ये ती पुन्हा गर्भवती असल्याचे संकेत मिळाले; मात्र त्यानंतर पिल्लांची नोंद झाली नाही. सध्या ती सुमारे १५ वर्षांची असून, सह्याद्रीच्या जंगलात आजही निर्भयपणे वावरते.
दृष्टिक्षेपात – सह्याद्री-कोकण-काली वाघ संचार मार्ग आणि लँडस्केपस्तरीय धोरण सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना आणि कर्नाटकातील काली व्याघ्रप्रकल्प यांना जोडणाऱ्या संचार मार्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. या कॉरिडॉरमध्ये सुमारे ३२ वाघ असून, त्यापैकी १४ वाघ महाराष्ट्रातील सह्याद्री परिसरात आहेत. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण (IFS) यांच्या नेतृत्वाखाली व्याघ्र संवर्धनाची व्याप्ती आता संपूर्ण लँडस्केपवर वाढविण्यात आली आहे, ज्यामध्ये राधानगरी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. सह्याद्री फाउंडेशनचा कार्यक्षेत्र विस्तार करून संपूर्ण लँडस्केपमध्ये भागीदारी आधारित आणि विज्ञानाधिष्ठित वन्यजीव संरक्षण धोरण राबवले जात आहे.

