25.4 C
Ratnagiri
Friday, October 31, 2025

देशातील सरकार घटना पाळतच नाही आ. भास्कर जाधव यांची सडकून टीका

७४ व्या घटना दुरुस्तीनंतर ऑक्टो. आज देशामध्ये...

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर...

पूररेषेतील बांधकामांना दिलासा ! नगरविकास विभागाकडून समिती

पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याने नियम शिथिल करावेत,...
HomeRajapurगाळ उपसा करा, आम्हाला जगू द्या! साखरीनाटे बंदर गाळात

गाळ उपसा करा, आम्हाला जगू द्या! साखरीनाटे बंदर गाळात

जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे बंदर विभागातर्फे एक टॉवर उभारण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूरमधील साखरीनाटे बंदर वर्षानुवर्षे गाळातच रुतलेले आहे. विजयदुर्ग खाडीपट्ट्यामध्ये येणाऱ्या नाणार-सागवेसह जैतापूर खाडीभागाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. वर्षानुवर्षे गाळ साचतच राहिल्यामुळे बंदरातून नौका ने-आण करणे धोक्याचे झाले आहे. मासेमारी करून आलेल्या नौका बंदरात आणणे आव्हानात्मक बनले आहे. कोट्यवधी रुयांची उलाढाल होत असलेल्या साखरीनाटे बंदरासह किनारपट्टीवरील खाडीभागातील मासेमारीवर अवलंबून असलेल्या हजारो मच्छीमार बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. साखरीनाटे बंदरासह खाडीकिनाऱ्यावरील गाळ उपसा करून अत्यावश्यक सोयी-सुविधा उभारण्यासाठी सर्वेक्षण झाले पाहिजे तसेच बंदरांच्या विकास आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मच्छीमारांचे मत आहे. याकडे सत्ताधारी लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महत्त्वपूर्ण सागरीकिनारपट्टी अन् साखरीनाटे बंदर – राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभली आहे. याच किनारपट्टीवरील साखरीनाटे बंदराची रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र म्हणून ओळख आहे. या किनारपट्टीवर साखरीनाटे, सागवे, अणुसरे, कातळी, नाणार, दांडेअणसुरे आदी भाग येत असून, या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमार व्यवसाय चालतो. या बंदर परिसरामध्ये सुमारे २५० ते ३०० नोंदणीकृत छोट्या-मोठ्या मच्छीमारी नौका असून, दररोज या बोटींमार्फत समुद्रात जाऊन मासेमारी केली जाते. देशभरातच नव्हे, परदेशातही या भागातील मासळी निर्यात होऊन तिची विक्री होते. या मासेमारीतून दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. मासेमारी करण्यासह अन्य विविध स्वरूपाची कामे अनेक मच्छीमार बांधव या ठिकाणी करत असून, हजारो कुटुंबांची उपजीविका वा उदरनिर्वाह या मासेमारीवर अवंलबून आहे.

गाळामध्ये रुतले साखरीनाटे बंदर – डोंगरदऱ्यातून येणाऱ्या नद्यांच्या पात्रांतून वर्षानुवर्षे वाहत येणारा गाळ बंदर परिसरामध्ये साचून राहिला आहे. या गाळामुळे समुद्रामध्ये मच्छीमारीला जाताना होड्या लोटताना आणि मासेमारी करून परतल्यानंतर बंदरात येताना मच्छीमारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदरामध्ये साचलेल्या गाळाचा उपसा व्हावा, अशी मच्छीमार बांधवांकडून सातत्याने मागणी केली जात आहे; मात्र बंदरामध्ये नेमका किती गाळाचा संचय झाला आहे, याचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अद्याप कोणतेही सर्वेक्षण झालेले नाही. त्याचवेळी शासनाकडून गाळ उपशाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे बंदरामध्ये साचलेल्या गाळ उपशाचा निर्णय गाळात रुतलेला आहे.

गाळाने भरलेली जैतापूर खाडी – ब्रिटिशकाळामध्ये राजापुरातून चालणाऱ्या व्यापाऱ्याच्या काळामध्ये जैतापूर खाडी परिसराला विशेष महत्त्व होते. त्या काळामध्ये राजापूर बंदरामध्ये येणारी मोठमोठी जहाजे आणि गलबते जैतापूर खाडीतून येत होती. सुरक्षित आणि सुलभजलवाहतूक होण्याच्यादृष्टीने त्या वेळी जैतापूर खाडीचा भाग खूप खोल होता; मात्र कालपरत्वे या खाडीपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला. हा गाळ उपसण्याकडे संबंधित झालेल्या दुर्लक्षामुळे या गाळाच्या प्रमाणात दरवर्षी अधिकच भर पडू लागली आहे. अशा स्थितीमध्ये गाळाने भरलेल्या या खाडीतून जहाजांची असलेली ये-जा सद्यःस्थितीमध्ये बंद झाली आहे. त्यातून ब्रिटिशकाळामध्ये नावारूपास आलेली ही जैतापूरची खाडी सध्या केवळ नावापुरती राहिली आहे.

बोटी अडकण्याच्या घटना – मासेमारी करून परतल्यानंतर बंदरामध्ये शिरताना जैतापूर सुरुबन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडीभागामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामध्ये बोटी अडकण्याच्या घटना वारंवार घडतात, विशेषतः ओहोटीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र स्वरूप धारण करते. अनेकदा बोटी खाडीतच अडकून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. या दरम्यान, बोटीचे यांत्रिक नुकसान होण्यासोबत मोठ्या प्रमाणावर मासळीही खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

टॉवर (बावटा) केवळ शोभेचे बाहुले – साखरीनाटे बंदराच्या सुरक्षेसाठी जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे बंदर विभागातर्फे एक टॉवर उभारण्यात आला आहे. टॉवरवर बावटा (ध्वज) लावून बंदरामध्ये मच्छीमारीसाठी जा-ये करणाऱ्या मच्छीमार बांधवांना विविध मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. त्याचवेळी, धोक्याच्याही सूचना दिल्या जातात; मात्र हा टॉवर साखरीनाटे बंदर परिसरातून अजिबात दिसत नाही. त्यामुळे हा बावटा केवळ नावापुरता ठरत आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उभारलेला हा टॉवर प्रत्यक्षात उपयोगी पडत नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरक्षेसाठी असलेली सुविधा जर मच्छीमारांनाच दिसली नाही तर त्याचा काय उपयोग, असा थेट सवाल मच्छीमार करत आहेत.

विकास आराखड्याची आवश्यकता – साखरीनाटे बंदर आणि परिसर असो वा नाणार-सागवे आणि जैतापूर खाडीभाग या परिसराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करून सुयोग्य विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये साखरीनाटे बंदरासह खाडीमध्ये मासेमारी करताना मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या, साचलेला गाळाचा उपसा, आवश्यक सोयी-सुविधांची उभारणी याबाबत मत्स्य व्यवसाय खाते, प्रशासन यांनी स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्याबाबत उपाययोजनांचा या विकास आराखड्यामध्ये अंतर्भाव करणे गरजेचे आहे जेणेकरून मच्छीमारांचे प्रश्न आणि अपेक्षित सोयी-सुविधा समजून घेऊन त्यांची सोडवणूक करणे अधिक सोयीचे ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular