जिल्ह्यात ऐन दिवाळीमध्ये चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्या फोडून नावडी परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. संगमेश्वर तालुक्यातील श्री वरदायिनी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्यात देवीसमोरील स्टीलची दानपेटी फोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी आणखी दोन मंदिरांच्या गाभाऱ्यातील दानपेट्या फोडून रोख रक्कम लंपास केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाचवेळी ४ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने संगमेश्वर पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले.
सौ. वैशाली संजय रहाटे वय ४४, रा. नावडी बाजारपेठ यांनी संगमेश्वर पोलिसात राहत्या घरातील कपाटातील सोन्याचे सुमारे साडेसात लाखाचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली होती. राहत्या घरात झालेल्या अचानक चोरीमुळे खळबळ उडाली होती.
याप्रकरणी नवीन दाखल झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. पोलिस उपनिरीक्षक देशमुख, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आव्हाड, कांबळे, बरगाळे, शिंदे, पंदेरे यांनी तपास करीत २४ तासात ही चोरी उघडकीस आणली. पोलिसांनी मोबाईल कंपनीचा सीडीआरवरून कोणाच्या संपर्कात आहे याची माहिती घेतली. पोलिसांनी घरातच तपासणी केली असता हा ऐवज सापडला. यामागे कोण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीद्दल कौतुक करण्यात आले आहे.