संगमेश्वर तालुक्यातील भोवडे येथील विनायक बोबडे यांच्या पडिक गोठ्यामध्ये मृत बिबट्या संपूर्ण कुजलेल्या स्थितीत आढळून आला. विनायक बोबडे यांचा पडिक गोठा जंगलमय भागामध्ये असल्याने, त्यात बिबट्याला काही भक्ष न मिळाल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोवडे येथील जीवन गणपत रवांदे हे रोजच्या प्रमाणे अंबाबन येथे गुरे चरावयास घेऊन गेले होते. परतताना वाडीच्या एक किमी. अंतरावर त्यांना काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. यानंतर त्यांनी वास कुठून येत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी ते पुढे गेले असता गावातील बोबडे यांच्या पडिक गोठ्यातून वास येत असल्याचे प्रथम लक्षात आले. जरा पुढे जाऊन डोकावून पाहिले असता गोठ्यात बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. तो पूर्ण कुजलेल्या स्थितीमध्ये होता. अवयव जरी शाबूत असले तरी, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके करण अजून कळून आलेले नाही.
त्यांनी सदरची बाब गावचे पोलिस पाटील प्रदीप अडबल व ग्रामस्थ यांना कळवली. तसेच याची माहिती देवरूख वनविभागाला देण्यात आली. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सचिन निलख व परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे परिमंडळ वनाधिकारी तौफिक मुल्ला, वनरक्षक सूरज तेली, आर. डी. पाटील, संजय रणधीर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याची पाहणी करून सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री केली व पंचनामा केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी कदम व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले.