पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने कोकणात सहकारी संस्थांचे जाळे खूपच कमी आहे, कोकणात सहकार म्हणावा त्या प्रमाणात फोफावलेला नाही. गावागावात सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था एवढ्या पुरताच सहकार रुजलेला आहे. सर्वेक्षणाच्या कामाची माहिती देताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोपान शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात ३ हजार २४८ सहकारी संस्थांची नोंदणी झालेली असून त्यापैकी १ हजार ८३७ गृहनिर्माण संस्था असून त्या या सर्वेक्षण मोहिमेतून वगळण्यात आल्या आहेत. उर्वरित असलेल्या १ हजार ४११ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही राज्यातील सहकारी संस्थाची झाडाझडती करण्याचे काम सुरु होणार असून जिल्ह्यातील ९ तालुक्यातून ७९९ संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी दिली आहे. या सर्वेक्षणात लेखापरीक्षण विभाग व प्रशासन विभाग यांच्याद्वारे हि मोहीम जिल्ह्यात राबविली जाणार आहे. यातील ६१२ संस्थांचे लेखारीक्षण पूर्ण झालेले असून ७९९ संस्थाचे लेखापरीक्षण अद्याप झालेले नाही अथवा त्याच्या प्रगतीचा अहवाल सहकारी संस्थांकडे जमा करण्यात आलेला नाही; त्यामुळे या ७९९ संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.या संस्थांचा सर्वेक्षण आरखडा १० ऑगस्ट पर्यंत तयार करावयाचा आहे, त्यासाठी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची बैठक झाली असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.
जिल्हा प्रशासनाला नमूद असलेल्या सहकारी संस्थांच्या कार्यालयात १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत सहकार विभागाचे कर्मचारी भेट देऊन त्या संस्था कार्यरत आहेत किंवा बंद आहेत याचा प्रत्यक्ष भेटीचा अहवाल सादर करतील. या अहवालाच्या आधारे ३० सप्टेंबरला बंद असलेल्या, पत्यावर सापडत नसलेल्या, कार्यस्थगित असलेल्या संस्थाना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल व कामकाज सुधारण्याची एक संधी देण्यात येणार आहे.