दोन मित्रांमध्ये ओझरे खुर्द येथे काजू बीच्या व्यवहारावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. २०२० साली या हाणामारीतून ओझरे खुर्द-गवळीवाडी येथील तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तब्बल तीन वर्षांनंतर हा निकाल लागला आहे.
संतोष शंकर घाटे वय ४४, रा. आंबव कोड कदमराव-कातळवाडी, ता. संगमेश्वर असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. ५ जून २०२० ला रात्री नऊच्या सुमारास आंबव-कातळवाडी येथे ही घटना घडली. संदीप विठ्ठल केदारी ४३, रा. ओझरे खुर्द-गवळीवाडी, ता. संगमेश्वर आणि आरोपी संतोष घाटे हे दोघे मित्र रात्री घाटे यांच्या घराच्या अंगणात बसले होते. त्या वेळी काजू बीच्या पैशांच्या वाटणी व्यवहाराबाबत चर्चा करीत होते. काही वेळाने या चर्चेला वेगळेच वळण लागले. पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि वाद एवढा वाढत गेला कि त्याचे रूपांतर शेवटी मारामारीमध्ये झाले.
संतोष घाटेने रागाच्या भरात कोयतीने त्याचा मित्र संदीप केदारी यांच्या डोक्यावर व कानाच्या खाली पाच वार केले. संदीप तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी पोलिस पाटील प्रकाश तुकाराम पांचाळ वय ५४, रा. आंबव-सुतारवाडी, ता. संगमेश्वर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते हे या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी आरोपी संतोष घाटे याला ५ जूनला अटक केली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. वर्षा प्रभू यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.