जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांत रुग्ण संख्या सातत्याने वाढतच चालली आहेत. मागील चोवीस तासात दोनशे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढतच गेली आहे. वाढती रुग्ण संख्या जिल्ह्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. यासाठी विशेष करून लसीकरण आणि कोरोना निर्बंध यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
जिल्ह्यात सध्या ४३५ अॅक्टिव्ह केसेस असून त्यामध्ये काही गृहविलगीकरणात तर अन्य व्याधी असलेले रुग्णालयामध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. पोलीस, डॉक्टर , आरोग्य विभाग आपापल्या परीने नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर बाजारपेठेमध्ये होणारी वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली. संगमेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख, सागर मुरुडकर व इतर पोलिस सहकारी यांनी रॅली काढली. जनतेला कोव्हिड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मागील वर्षीसारखी लॉकडाऊन आणि संचारबंदी सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम पोलिसांमार्फत सुद्धा करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर लोकांचे काही प्रमाणात कोरोना निर्बंधान्कडे दुर्लक्षच झाले. बिना मास्कचे फिरणे, सोशल डीस्टांसिंगचा फज्जा अशा अनेक गोष्टी घडत गेल्या आणि त्यामुळे कोरोनाची परिस्थिती बिघडत गेली.
कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येसह नव्या विषाणूच्या वेगाने वाढण्याने आरोग्य विभाग पुन्हा चिंतेत दिसू लागला आहे. दिवसेंदिवस या रुग्णसंख्येमध्ये वाढच पाहायला मिळत आहे.