कोकण रेल्वेमुळे कोकण भाग अनेक शहरांना जोडला गेला आहे. कोकणाचे सौदर्य पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक दाखल होत असतात. काही रेल्वे मार्गे तर काही खाजगी वाहतुकीने प्रवास करतात. रत्नागिरी मधील काही रेल्वे स्थानकांची अवस्था एवढी गंभीर झाली आहे कि, रेल्वेसाठी उभे राहणे देखील कठीण बनले आहे.
रत्नागिरी संगमेश्वरमधील धामणी येथील कोकण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे रहाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सर्वच प्रवासी निवारा शेडवरील कौले उडून गेली आहेत, तर काही फुटली आहेत. यामुळे भर पावसामध्ये रेल्वे प्रवासासाठी उभ्या रहाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वच प्रवासी निवारा शेडची अशी दुरावस्था झाली आहे, मात्र रेल्वे प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा या गोष्टींकडे कानाडोळा करत आहेत.
संगमेश्वरमधील धामणी कोकण रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे रहाण्यासाठी बांधण्यात आलेल्या जवळपास सर्वच प्रवाशी निवाराशेड वरील कौले उडाल्याने पावसाचे पाणी शेडमध्ये येऊन चिखल निर्माण झाला आहे. शेडमध्ये थांबल्यास तुटलेली कौले डोक्यात पडून जखमी होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेप्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे .
मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याकडे प्रवाशांनी कैफियत मांडली असता आपण याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र देत असून याची तात्काळ दखल न घेतल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू असा इशारा दिला आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन सोडवाव्यात व प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी रास्त अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.