शिवसेनेच्या चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी शिवसेनेला अचानक केलेल्या रामरामा नंतर शिवसेनेला एक प्रकारे धक्काच बसला आहे. अनेक बंडखोर आमदारांनी यामागे कारण केवळ एकच संजय राऊत असल्याचे सांगितले. त्यांचे बेताल बोलणे आणि दिली जाणारी वागणूक यामुळे अनेक जण दुखावत असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर बंडखोर आमदारांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना फुटली, असा आरोप देखील बंडखोर आमदारांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. एरवी पत्रकार परिषदेत प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देणारे राऊत आता काहीशे शांत झाल्याचं दिसत आहे. नुकतीच झालेली एक पत्रकार परिषद त्यांनी अवघ्या दीड मिनिटांत संपवली. आणि यावेळी विचारण्यात आलेल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार आणि मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्यास नकार दर्शवला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलं आहे. राज्याबाबत काही प्रश्न असतील तर तेवढेच प्रश्न विचारा, असं म्हणत ते पत्रकारांवरच भडकले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेतून तडक उठून गेले.
खरंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांनी विविध प्रकारचे आरोप प्रत्यारोप देखील केले होते. “गद्दारांनो तुम्ही विकले गेले आहात, गळ्यात पाटी घालून कामठीपुऱ्यात उभं राहा” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेमुळे बंडखोर आमदारांचा संजय राऊतांवर प्रचंड रोष आहे.