राज्यात सध्या संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांची चांगलीच चर्चा सुरु आहे. काल दादरला शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. आज पुन्हा संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांवर थेट टीका केली. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. त्यांना या घोटाळ्यातून जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावले आहेत. एका ईडीच्या अधिकाऱ्याला त्यातील १५ कोटी रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सोमय्या यांनी प्रत्युत्तरादाखल दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यापूर्वी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असे पुन्हा एकदा म्हटले आहे. आज सकाळीच राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. ईडीच्या नावाने धमकी देऊन सोमय्याने कोट्यवधी जमा केले. बिल्डर्सना ईडीच्या धमक्या देऊन पैसे लाटले आहेत.
दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार नाटकं करुन जनेतची दिशाभुल करत आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पीएमसी बँक घोटाळा किरीट सोमय्या यांनी समोर आणला. संजय राऊत का चौकशीसाठी गेले नाहीत? माझ्यावर संशय असेल, तर माझी खुशाल चौकशी करा. असे किरीट सोमय्या म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी सुद्धा संजय राऊतांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर खोचक टिपण्णी केली आहे. ‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’, असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.