यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूर शहर आणि लगतच्या १० गावामध्ये दि. १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात वाढ होऊ नये यासाठी यावर्षी सुद्धा आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासन नियमांनुसार तयार झाले असून, आजपासून पंढरपूर शहरासह १० गावात संचारबंदीला सुरुवात करण्यात आली आहे.
काही मानाच्या पालख्यांचं आषाढीसाठी पंढरीकडे प्रस्थान झालं आहे असून, उर्वरित पालख्याही काही वेळामध्ये पंढरीच्या दिशेनं रवाना होतील. मागील वर्षांपासून मानाच्या पालख्या पंढरपूरला नेण्याचा मान एस.टी. महामंडळाला देण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्याला घातलेला कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत नसल्याने, आणि कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अजून आटोक्यात आली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध घातले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.
शिवशाही बसने माऊली, माऊली च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, अनेक वारकरी निष्ठेने फुलांच्या पायघड्या वाटेवर घालून, बसवर फुले उधळून पावसा पाण्याचे भान विसरून दुरूनच माऊलींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून, पालखीच्या बसची वाट बघत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने पायी यात्रेला परवानगी देण्यात यावी यासाठी निदर्शने करण्यात आली. परंतु, कोरोनाचे संकट लक्षात घेता, फक्त ४०० वारकर्यांना कोरोनाचे निर्बंध पाळून मानाच्या पालख्यांसह पंढरपूर मध्ये प्रवेश स्वीकारला जाणार असल्याची माहिती मिळाली.