रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांची जशी अभ्यासामध्ये उंच उडी आहे त्याप्रमाणेच विविध खेळांमध्ये सुद्धा रत्नागिरीतील खेळाडूंची चमक जबरदस्त आहे. अनेक खेळाडूनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भरारी मारून पुरस्कार मिळवले आहेत. शिक्षणासोबतच खेळाकडे सुद्धा योग्य रित्या लक्ष पुरविले तर यश मिळविणे कठीण नाही.
छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित खेलो इंडिया स्पर्धेसाठीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्वर्या सावंत हिचा आदर्श समोर ठेवून सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खेलो इंडियासारख्या स्पर्धा खेळताना जास्तीत जास्त खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे, असे प्रतिपादन युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी केले.
या स्पर्धेत मुला-मुलींच्या आठ संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच विजयी, उपविजयी आणि उत्कृष्ट खेळाडूंसाठी संगमेश्वर राजवाडी येथील पेम संस्थेतर्फे चषक ठेवण्यात आला आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी विशाल बोडके, स्पर्धाप्रमुख विनोद मयेकर, पंकज चवंडे, पंचप्रमुख राजेश कळंबटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्वर्या सावंत, प्रसाद सावंत, राजेश चव्हाण यांच्यासह विविध संघांचे प्रशिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतोनात मेहनत घेताना दिसतात. खेलो इंडियासारख्या विविध संधी देखील दरवर्षी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्यामुळे या संधीचा फायदा उठवून विविध खेळांमध्ये रत्नागिरीचे नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरले जावे अशी अपेक्षा आहे. परंतु हे यास मिळविण्यासाठी विशेष मेहनत, सराव आणि खेळाडू वृत्तीची आवश्यकता आहे.