बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, रात्री उशिरा कोरोनाचा रिपोर्ट त्यांना मिळाला आहे. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली असल्याचे माहितीमध्ये समजले आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना संक्रमित झाले होते. गांगुली यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले आहेत, तरीही त्यान कोरोनाची लागण झाली आहे. सौरभ गांगुलीला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. परंतु, होम आयसोलेशन मध्ये न राहता, गांगुलीला कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटामध्ये सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हि चिंतेची बाब ठरत आहे. जानेवारी महिन्यामध्ये छातीत दुखत असल्याने गांगुलींना कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी देखील करण्यात आलेली होती. घरातील जिममध्ये व्यायाम करत असताना, त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येत असतानांच, अचानक उद्भवलेल्या नव्या व्हेरीयंटची चिंता असताना गांगुली पॉझीटीव्ह आल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जेंव्हा कुटुंबातील इतर सदस्य या कोरोनाच्या विळख्यात सापडले होते, तेंव्हा गांगुली मात्र त्यातून बचावले होतेत. सध्या आता ते उपचारासाठी कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात उपचार घेत आहेत.