शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता टळली. पुण्याहून आलेला पर्यटक मासे गरवताना समुद्राच्या उधाणात वाहून जात होता; परंतु स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवले. रहिम मिसाक्शीर असे त्याचे नाव आहे. छंद त्याच्या जीवावर बेतला होता. स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी, मिसाक्शीर हे मासे गरवण्याचा छंद जोपासण्यासाठी मुलासोबत मिऱ्या येथील भारतीय शिपयार्ड कंपनीजवळ आले होते. मासे गरवण्यासाठी किनाऱ्यावर उतरले. समुद्राला प्रचंड उधाण होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पुढे जाऊ नका, असा सल्ला दिला होता; परंतु त्यांनी ते ऐकले नाही आणि मासे गरवण्यासाठी आत गेले. या वेळी अचानक आलेल्या अजस्त्र लाटेच्या तडाख्याने मिसाक्शीर समुद्रात पडले. समुद्रातील लाटांच्या तडाख्याने ते किनाऱ्यावरील खडकांवर आपटत होते. सावरून वर येण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु लाटांच्या माऱ्यामुळे पुन्हा आत जात होते.
या दरम्यान देवदुतासारखे स्थानिक ग्रामस्थ अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण धावून आले. त्यांनी धाडस दाखवत त्यांना समुद्रातून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये ते किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कापडगाव येथील तरुणाचा पडून मृत्यू झाला होता. स्थानिक लोक धोक्याची सूचना देत असतानाही अनेकदा पर्यटक किंवा नागरिक दुर्लक्ष करतात ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. सुदैवाने, आज मात्र ग्रामस्थांच्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.