देवरुखच्या सहयाद्री नगर येथील प्रख्यात केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांचे अपहरण करत त्यांना लुटणाऱ्या आरोपींचा कसून शोध सुरू असून काही धागेदोरे आमच्या हाती लागले आहेत, मात्र तपासाच्या दृष्टीकोनातून काही गोष्टी गोपनिय ठेवणे आवश्यक आहे, असे सांगत या आरोपींना लवकरच पकडू, असा विश्वास देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान हे कृत्य करणारे माहितगार असावेत, असा कयास वर्तविण्यात येत आहे. बुधवारी रात्री देवरूख साखरपा मार्गावर रात्रौ १०.३० वा. च्या सुमारास एका मारूती इर्टिगा कारने धनंजय केतकर यांच्या बीएमडब्ल्यू कारला धडक दिली.
त्यानंतर त्या मारूती गाडीतून ५ मंडळी खाली उतरली आणि नुकसान भरपाई मागू लागली. यावरून केतकर आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्याचवेळी एकाने धनंजय केतकर यांच्या अंगावर बुरखा टाकला आणि त्यांना इर्टिगा कारमध्ये कोंबले. गाडी सुसाट पळवत राजापूरजवळील वाटूळ परिसरात त्यांना घेऊन आले. मधल्या काळात धनंजय केतकर यांच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या ३ साखळ्या आणि २० हजार रूपये असा एकूण १४ ते १५ लाखांचा ऐवज या लुटारूंनी काढून घेतला. त्यासाठी त्यांना मारहाणही करण्यात आली.
५ लाख तयार ठेवा – लुटारूंनी केतकर यांच्या घरी फोन करून ५ लाख रूपये तयार ठेवा, मार्लेश्वर फाट्यावर जी व्यक्ती येईल, त्याच्याकडे हे पैसे द्या, असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. केतकर यांनी देखील आंपल्या घरी मुलीला फोन करून ५ लाख रूपये घेऊन यायला सांगितले. त्यानंतर केतकर यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र काही वेळानंतर केतकर यांचे स्नेही बापू शेट्ये यांनी मोबाईल लावला तेव्हा त्यांचा केतकरांशी संपर्क झाला. लुटारूंनी आपल्याला साधारणपणे रात्री १२.३० वा. वाटूळच्या पुलाखाली सोडून दिले आणि ते निघून गेले, अशी माहिती केतकर यांनी शेट्ये यांना दिली. दरम्यान शेट्ये आणि केतकर परिवाराने यानंतर देवरूख पोलीस स्थानकाशी संपर्क साधल्यानंतर पोलीसांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान केतकर यांना महामार्गावर राजापूर पोलीसांची गस्त घालणारी गाडी दिसली. त्यांनी ती थांबवली. त्यानंतर राजापूर पोलीसांनी पुढील सूत्रे हलविली आणि केतकर यांना देवरूखपर्यंत पोहोचविले. रात्री ३ वा. च्या सुमारास ते देवरूखमधील घरी पोहोचले.
आरोपींचा शोध सुरू – या प्रकाराला आता ४८ तासांपेक्षा अधिक वेळ झाला असून अजूनही लुटारूंचा पत्ता लागलेला नाही. पोलीसांची ३ पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. तपासात फारशी प्रगती झाल्याचे दिसत नाही. मात्र काही गोष्टी आम्हांला समजल्या असून त्याबाबत गोपनियता बाळगणे गरजेचे आहे, लवकरच आम्ही आरोपींपर्यंत पोहोचू असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.