बाजारात बनावट नोटांची हेराफेरी करणाऱ्या चिपळूण व खेड तालुक्यातील संगलट सुतारवाडी येथील सुतार, रिक्षाचालकासह चौकडीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला. या नोटा कोठे छापल्या गेल्या आणि त्या चिपळूणमध्ये कशा आल्या, याचा तपास होणे गरजेचे आहे. दहा दिवसांनंतरही पोलिसांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नोटा छापण्याची मशीन सापडलेली नाही. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहानवाज शिरलकर (५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०) आणि ऋषिकेश निवलकर (२६) (दोघेही राहणार खेड – संगलट यांच्याविरुद्ध मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. शिरलकर आणि खेतले हे चिपळूणमधील रहिवासी आहेत.
खेतले हा व्यवसायाने चालक असून, शिरलकर याचे मिरजोळी येथे सर्व्हिसिंग सेंटर आहे. संदीप आणि ऋषिकेश हे व्यवसायाने सुतार असून, ते खेडमधील रहिवासी आहेत. २० जुलैला मानखुर्द उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी या चौघांना बनावट नोटांसह ताब्यात घेतले. तपासणीमध्ये १०० रुपयांच्या १ हजार ६००, २०० रुपयांच्या दोन हजार ४०० आणि ५०० रुपयांच्या ३०० अशा एकूण सात लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण चार हजार ३०० बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी मुंबई पोलिस चिपळूण आणि खेडला आले.
चिपळूणमधील एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये पोलिसांना ४२ हजाराच्या बनावट नोटा सापडल्या. या नोटा ताब्यात घेऊन पोलिस पुन्हा मुंबईला गेले; मात्र या नोटा छापल्या कुठे गेल्या? त्या चिपळूणमध्ये कशा आल्या? या चौघांनी जर बनावट नोटा छापल्या असतील तर नोटा छापण्याचे प्रशिक्षण त्यांना कुठे दिले गेले? ती मशिन कुठे आहे? या संदर्भातील कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या व्यवसाय कधीपासून सुरू होता खेड तालुक्यांमध्ये देखील याचा वापर झालाय काय नोटाचा याचाही तपास होणे गरजेचे असून तशी मागणी जनतेकडून केली जात आहे.