चिपळूणमधील धामणवणे खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे. त्याला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील बुळरगी येथे त्याच्या सासरवाडीच्या गावातून ताब्यात घेण्यात आले. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या अटकेमुळे आता खून प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होणार आहे. रविशंकर कांबळे (सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. धामणवणे खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा ६ ऑगस्टला खून झाल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. ‘पोलिसांनी या प्रकरणी जोरदार तपासाची सुत्रे हलवली. अनेकांचे जाब जबाब नोंदवले व ट्रॅव्हल एजंट जयेश गोधळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून या प्रकरणात अन्य एक साथीदार असल्याचे पुढे आले. यानंतर दुसरा आरोप रविशंकर कांबळे याचा शोध सुरू झाला. तो मुळचा सातारा येथील होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तो सातारा येथे आढळून आला नाही. यानंतर त्याच्या फोनचे सीडीआर मिळवण्यात आले. त्यामध्ये तो अनेकदा कर्नाटक मधील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले.
कर्नाटकात सासुरवाडी – चिपळूण पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली. त्यानंतर चिपळूण पोलिसांचे पथक कर्नाटकात दाखल झाले. गुलबर्गा जिल्ह्यातील बुळरगी ही त्याची सासुरवाडी होती. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला. म. ात्र तो सापडत नव्हता. सासुरवाडीमध्ये त्याची पत्नी आणि मेव्हणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आरोपी कांबळेचा पत्ता मिळवला आणि त्याला ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी त्याला चिपळूणमध्ये आणून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी जेरबंद झाले असून लवकरच या खुनात वापरलेली दुचाकी, चोरून नेलेले दागिने हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गर्शनाखाली या तपास कार्यात सहायक पोलीस निरीक्षक ओम आगाव यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.