शहराजवळील कुवारबाव येथे ‘सेकंड महाराष्ट्र नेव्हल युनिट’ उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. हे एनसीसी भवन बांधकामासाठी निधी वितरणास शासनाची मान्यता मिळाली आहे. ४२ कोटी ४३ लाखांचा हा प्रकल्प आहे. त्यापैकी पाच कोटी रुपये वित्त विभागाकडून वितरित केले जाणार आहेत. जहाज व नौका मॉडेल तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. तसेच मुले-मुली निवासव्यवस्था असेल, अशी तळमजल्यासह चारमजली इमारत उभारली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून हे युनिट इथे होत आहे. गेली पाच ते सहा वर्षांपासून ते याचा पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. कुवारबांव (ता. रत्नागिरी) येथे २ महाराष्ट्र नेव्हल युनिट या कार्यालयासाठी एनसीसी भवन बांधकामासाठी २०२२-२३ च्या दरसुचीप्रमाणे ४२ कोटी ४३ लाख ६१ हजार अंदाजित खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत या युनिटच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी ५ कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा शासननिर्णय वित्त विभागमधील सचनांना अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी एनसीसी युनिट उभारण्यासाठी जागा मिळावी म्हणून प्रस्ताव देण्यात आला होता.
युनिटला हवी स्वतःची जागा ! – येथे सेकंड महाराष्ट्र एनसीसी युनिट १९५६ पासून कार्यरत असले तरीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खोलीतच ते आहे. भारतीय नौसेनेतील तत्कालीन कॅप्टन ए. के. शर्मा येथे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. एवढ्या मोठ्या पदावरील या व्यक्तीला केवळ एका खोलीतच एनसीसीचा कारभार चालवावा लागत आहे. सैन्य हे देशाची सर्वात मोठी ताकद आणि संरक्षक असताना एनसीसीबाबत सध्या शासनदरबारी उदासीनता दिसत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये या युनिटच्या कार्यक्षेत्रात असूनही युनिटसाठी स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे छात्रांची शिबिरे, राहण्याची व्यवस्था आदींसाठी जागा शोधण्यातच वेळ जातो. जिल्हाधिकारी, आमदार उदय सामंत यांना यापूर्वी शर्मा यांनी शासकीय जागेसाठी प्रस्ताव दिला होता.