रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ आहेत. निष्ठावंतांना मिळालेल्या वागणुकीनंतर ठाकरे गटामध्ये खदखद आहे. त्याचा फायदा घेत उद्योगमंत्री आणि शिवेसना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची कालच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये गुप्त बैठका झाल्या. २४ तारखेला दावोसवरून आल्यानंतर मोठा पक्षप्रवेश होईल, असे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्ट केले. सामंत पुढे म्हणाले, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना कळून चुकलेय की, आम्ही सच्चे होतो आणि आहोत. ठाकरेगट काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्या पक्षातील सर्वजण आता शिवसेनेत येत आहेत.
त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय भविष्य सांगायचे झाल्यास ठाकरे गटाची जिल्ह्यात काँग्रेस संघटना झाल्याचे चित्र पाहायला मिळणार असल्याचा चिमटा सामंत यांनी काढला. रत्नागिरीत मोठा राजकीय पक्षप्रवेश होणार, याचे संकेत त्यांनी दिले. रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत हे नियोजित कार्यक्रम सोडून सुमारे तासभर अज्ञातस्थळी मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन गेले होते. त्यानंतर काही काळातच समजले की, उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांची गुप्त बैठक होती. त्यामुळे प्रवेशाची पूर्ण तयारी सामंत यांनी केली आहे असे समजते. परंतु, राज्याचे एक शिष्टमंडळ जागतिक परिषदेला दावोसला जाणार आहे. यामध्ये उद्योगमंत्री सामंत देखील आहेत.