जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाची मुला-मुलींची १० वसतिगृह आहेत; परंतु त्यापैकी आठ वसतिगृहांमधील मुला-मुलींची सुरक्षा वाऱ्यावर आहे. वसतिगृहातील मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी दहा वसतिगृह अधीक्षक (रेक्टर) आवश्यक असताना अवघे ३ रेक्टर आहेत. त्यांच्या हाती दहा वसतिगृहाची सुरक्षा असल्याने वसतिगृहातील मुलांची सुरक्षा सुरक्षारक्षकांच्या हातात आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक न्याय विभागामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत समाजकल्याणतर्फे दहा हॉस्टेल चालवली जातात. यामध्ये रत्नागिरी कुवारबाव येथे मुला व मुलींसाठी वसतिगृह असून, जेलरोड येथे मुलांसाठी एक आणि मुलींसाठी दोन वसतिगृह आहेत. राजापूर तालुक्यातील पाचल येथे मुलांचे एक, सावर्डे येथे मुलींचे एक, देवरूख येथे मुलांचे एक, चिपळूण येथे मुलगे व मुलींचे एक-एक तर मंडणगड येथे मुलांचे एक वसतिगृह सुरू आहे. सध्या रायपाटण वगळता अन्य वसतिगृहात शिक्षणासाठी असणाऱ्या मुला व मुलींची संख्या मोठी आहे.
शालेय, महाविद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची जबाबदारी रेक्टरवर असते. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम रेक्टर करतात; मात्र जिल्ह्यात असणाऱ्या दहा वसतिगृहापैकी फक्त तीनच ठिकाणी रेक्टरची पदे भरलेली आहेत. उर्वरित सात पदे रिक्त आहेत. मागील काही वर्षे या ठिकाणी फक्त सुरक्षारक्षकांमार्फतच विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. रायपाटण व रत्नागिरी जेलरोड येथील मुलांचे वसतिगृह आणि कुवारबाव येथील मुलींचे वसतिगृह या ठिकाणी रेक्टर कार्यरत आहेत. मुलींच्या वसतिगृहात शक्यतो महिला सुरक्षारक्षक असून, त्याच मुलींवर लक्ष ठेवून त्यांच्या सोडवण्यासाठी समस्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत असतात. सध्या मुलींचे जेलरोड येथील वसतिगृह, सावर्डे, चिपळूण येथील वसतिगृहात रेक्टर नसल्याने हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यातही वसतिगृहात रेक्टरची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा आता सुरक्षारक्षकांच्या हाती असल्याने पालकवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.