पावसाला सुरुवात होण्याची लक्षणे जाणून शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. भात शेती कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्यामुळे जवळपास असलेल्या खासगी कृषिसेवा केंद्रांमध्ये शेतकरी बियाणे, खते, औषधांची खरेदी करण्यासाठी पोहोचत आहे; मात्र कृषिसेवा केंद्रांमध्ये युरिया, सुफला ही खतेच उपलब्ध नाही आहेत. शासनाने पुरवठा बंद केल्याने खते नाहीत, असे कृषिसेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी शेतात पेरायचे कस ! या अडचणीत आहेत.
चिपळूण तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात हे एकमेव पीक अधिक प्रमाणावर घेतले जाते. भात पिकामध्ये नवनवीन आलेल्या संकरित वाणांमुळे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जंगल संपत्ती कमी झाल्याने जंगलातून पावसाळ्यात शेतजमिनीत वाहून येणारा पालापाचोळा येणे बंद झाले आहे. गुरांची संख्या कमी झाल्याने सेंद्रिय खतेही कमी झाली आहेत. त्यामुळे येथील सर्वच शेतकऱ्यांना भातशेतीसाठी युरिया, सुफला या रासायनिक खतांवरच अवलंबून राहावे लागते आहे.
मोसमी पावसापूर्वी शेतीची बांध बंदिस्ती, भाजणी ही कामे पूर्ण करून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांनी भातबियाणे खरेदी केली आहेत. खते खरेदी करण्यासाठी कृषिसेवा केंद्रांवर हेलपाटे मारत आहेत; मात्र युरिया, सुफला या खतांचा पुरवठा गेले अनेक दिवस राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर यांच्याकडून कृषिसेवा केंद्रांना तसेच सोसायट्यांना करण्यात आलेला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने संबंधित कंपनीला ही रासायनिक खते पुरवठा करण्यावर निर्बंध घातल्याने कंपनीने पुरवठा करणे बंद केले असल्याचे सांगितले जात आहे.
शासनाने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीला, काळा बाजार रोखण्यासाठी या खतांचा पुरवठा सध्या करू नये, असा आदेश केल्याने या कंपनीने कृषिसेवा केंद्रांना सध्या पुरवठा करणे बंद केले आहे.