पोलीस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द ठरवल्यानंतर पोलीस महासंचालकांनी राज्यातील भरती झालेल्या सर्व जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना त्याबाबतचे आदेश बजावले आहेत. २०१९ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारीच आता रद्द होणार आहे.२०१९ मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई चालक या पदाकरिता एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज दाखल केल्याप्रकरणी अनेक उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली होती. याचा फटका सरसकट सर्वच उमेदवारांना बसला होता. ज्या उमेदवारांनी एकच अर्ज दाखल केला होता अशा उमेदवारांचीदेखील सेवा समाप्त करण्यात आली होती. या बाधित उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई खंडपीठ या ठिकाणी दाद मागितली होती.त्यानुसार ११ एप्रिल २०२२ चा निर्णय रद्दबातल करण्यात आला.
सन २०१९ मध्ये पोलीस शिपाई चालक पदाकरिता ३० नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेली जाहिरात ग्राह्य धरण्यात आली. तसेच ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक घटकात आवेदन अर्ज केले अशा उमेदवारांची निवडदेखील झाली होती. त्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांनी आदेश जारी केले आहेत. सन २०१९ मध्ये पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्याप्रकरणी ६ मे २०२२ व २२/७/२०२२ अन्वये निर्गमित करण्यात आलेली पत्रे रद्द करण्यात येत असल्याचे विशेष पोलीस म हानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी या आदेशात पुढे नमूद केले आहे की, १७/३/२०२३ च्या न्यायनिर्णयानुसार सन २०१९ मध्ये पोलीस शिपाई चालक भरतीकरिता ३०/११/२०१९ मध्ये प्रसारित केलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे ज्या उमेदवारांनी एकच अर्ज दाखल केला मात्र ज्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका अशा उमेदवारांची यादी नव्याने प्रसारित करावी तसेच ज्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याकरिता त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी व त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी असे आदेश पोलीस अधीक्षक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.