25.6 C
Ratnagiri
Wednesday, July 23, 2025

सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर, डॅशबोर्ड बनवण्याचे आदेश

सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती...

अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून, विशेषतः बीएलओ (बूथ...

समर्थनार्थ किती जमीन हे शेतकरीच सांगणार – उद्योगमंत्री उदय सामंत

तालुक्यातील वाटद एमआयडीसी येथे धीरूभाई अंबानी डिफेन्ससह...
HomeRajapurअखेर राजापुरात मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री

अखेर राजापुरात मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री

मासे विक्रीमुळे होणारी घाण आणि पसरणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर मासे विक्री करण्याऐवजी लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री करण्याच्या झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने मासे विक्रेत्या महिलांसमवेत घेतलेल्या निर्णयानुसार, आता रस्त्यावर न बसता मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री करण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक रस्त्यांची मच्छीच्या दुर्गंधीपासून आता सुटका झाली आहे. नगर पालिकेने उभारलेले मच्छी मार्केट ओस अन् शहरातील रस्त्यावर बसून मासे विक्री असा प्रकार होता. त्या ठिकाणी टाकण्यात येणारी घाण आणि पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी पथ रस्त्यावर या मासे विक्रीमुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीही होत होती. त्यामुळे महिलांनी मच्छी मार्केटमध्ये जाऊन मासे विक्री करण्यासंबंधित नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतादूत महेश शिवलकर यांच्यासमवेत संवाद साधला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेला मासे विक्रेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील मासे विक्रीची समस्या दूर करण्याबाबत स्वच्छतादूत आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे अन् केलेल्या प्रयत्नांचे शहरवासीयांकडून कौतुक केले जात आहे.

दुर्गंधी आता दूर झाली – मच्छी मार्केटमध्ये मासे विक्रीसाठी सर्वांना जागा मिळावी, या उद्देशाने जागांचे सीमांकन करण्यासह जागा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाने पुढाकार घेतला होता. मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री सुरू झाल्याने सार्वजनिक रस्त्यावर मासे विक्रीमुळे होणारी घाण आणि पसरणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे.

पालिकेची कामगिरी – दरम्यान, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता तथा आरोग्य विभागाच्या प्रमुख सुप्रिया पोतदार, आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुशील यादव, मुकादम राजा जाधव, स्वच्छतादूत महेश शिवलकर यांनी मच्छीमार्केटमध्ये हजर राहून सर्वच मच्छी विक्रेत्यांना एकत्रित मासे विक्री करण्याबाबत प्रोत्साहित केले. तसेच कायमस्वरूपी नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही केले.

RELATED ARTICLES

Most Popular