सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वादात शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे हे काल पोलिसांसमोर हजर झाले. या हल्ल्याच्या चौकशासाठी उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांना २१ तारखेला नोटीस बजावली होती.
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी सांगितले असून, यापुढेही चौकशीसाठी बोलविल्यानंतर आपण हजर राहणार असल्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. जी माहिती पोलिसांना आवश्यक होती ती आपण दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता नारायण राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आमदार नितेश राणे यांना या प्रकरणामध्ये विनाकारण अडकवल जातं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी नितेश राणेंविरोधात शिवसेना आणि शिवसैनिक आक्रमक झालेलं पाहायला मिळाल आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला त्वरित अटक करा, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येते हे लक्षात आल्यानंतर, सूड भावनेने आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
कणकवलीमध्ये घडून आलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आम. नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा संबंध लावून पोलीस अधिकाराचा गैरवापर करून नितेश आणि माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला आहे.