रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून आयात नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमिवर उमेदवारीसाठी इच्छूक असणारे आणि गेली ४० वर्ष शिवसेनेशी निष्ठा ठेवून तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेची मजबूत बांधणी करणारे जि.प.चे माजी उपाध्यक्ष उदय बने हे त्यांची भूमिका ३० ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहेत. उदय बने कोणता धमाका करतात याविषयी राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चाना पेव फुटले आहे. उदय बने हे गेली ४० वर्ष शिवसेनेत काम करत आहेत. संघटना तालुक्यात रुजविण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.
पक्षाचे निरिक्षक आमदार मिलिंद नार्वेकर हे पक्षप्रमुखांच्या आदेशाने जेव्हा इच्छूक उमेदवारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रत्नागिरीत आले होते त्यावेळी उदय बने यांनी आपण इच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते. तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी आणि जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक असे ३ नेते इच्छूक होते. तिघांपैकी ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याचे काम करण्याची ग्वाही उर्वरित दोघांनी दिली होती. तसेच रत्नागिरीतील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षातील निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती.
मोठी नाराजी – मात्र उमेदवारी ऐनवेळी भाजपम धून पक्षात दाखल झालेल्या माजी आमदार बाळ माने यांना देण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काहींनी ही नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. स्वतः उदय बने यांनी देखील उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. स्वतःला उमेदवारी मिळाली नाही मात्र अन्य निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनाही ही उमेदवारी न मिळाल्याबद्दल बने यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
बुधवारी काय सांगणार? – नाराज असलेले उदय बने आता कोणती भूमिका घेतात याविषयी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चाना पेव फुटले आहे. या पार्श्वभूमिवर येत्या बुधवारी ३० ऑक्टोबरला ते त्यांची भुमिका जाहीरपणे मांडणार असल्याचे सांगण्यात आले. गेली ४० वर्ष मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. हा कालावधी खुप मोठा आहे. त्यामुळे केवळ छोटीशी प्रतिक्रीया देवून विषय संपणारा नाही. मी माझी भुमिका ३० ऑक्टोबरला जाहीर करेन असे उदय बने यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उदय बने काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.