उपराजधानी नागपूरसह अनेक बड्या शहरांमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून धक्कादायक म्हणजे नागपूर-रामटेकमध्ये उघड झालेल्या या रॅकेटमध्ये रत्नागिरीतील उच्चशिक्षित तरूणींचा सहभाग असल्याचे कारवाईत उघड झाले आहे. २५ दिवसांसाठी १ लाख रूपयांचा करार करून या तरूणींना या जाळ्यात ओढले गेले आहे. सापडलेल्या तरूणीची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. रत्नागिरीतील अन्य काही उच्चशिक्षित तरूणीही या रॅकेटमध्ये सामील असाव्यात असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आदी बड्या शहरातील अनेक मोठमोठ्या हॉटेलसह ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, स्पा सेंटर, पंचकर्म केंद्र आणि युनिसेक्स सलूनमध्ये बिनधास्तपणे देहव्यापार सुरु असतो. मात्र, आता देहव्यापाराचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. कोलकाता, दिल्ली, गोवा, हरियाणा, आसाम, जम्मू काश्मीर या राज्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील तरुणींना नागपुरात सेक्स रॅकेटम ध्ये सहभागी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच रामटेकमधील एका मोठ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात रत्नागिरीच्या उच्चशिक्षित तरुणीला आंबटशौकिन ग्राहकासह पकडण्यात आले. या प्रकरणी हॉटेलमालकासह ६ जणांवर रामटेक पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
प्रसिध्द हॉटेलमध्ये व्यवसाय – पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, रामटेकमधील नगरधन येथे असलेले एक हॉटेल हे आंबटशौकीन ग्राहकांसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील तरुणींसह अन्य राज्यातील तरुणी देहव्यापार करण्यासाठी येत असतात, दिल्ली, मुंबई आणि कोलकाताच्या तरुणी महिन्याभराचा करार करुन सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होत असतात.
१ लाखांचा करार – एका तरुणीला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि जवळपास ८० हजार ते १ लाख रुपयांमध्ये २५ दिवसांचा करार केल्या जाते. दिल्ली आणि मुंबईच्या तरुणी विमानाने प्रवास करतात. त्यांची हायफाय बडदास्त राखली जाते. विशेष पार्थ्यांचे आयोजन तसेच या तरुणींना फार्महाऊस आणि विशेष आयोजित पार्थ्यांमध्ये पाठवण्यात येते. या हॉटेलमध्ये आंबटशौकीन ग्राहकांनी पैसे मोजल्यानंतर काही तरुणींचे फोटो दाखवले जातात. फोटोतील तरुणींची निवड केल्यानंतर त्या तरुणीला ग्राहकासोबत पाठवले जाते. या प्रकारामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक आंबटशौकिनांची गर्दी या हॉटेलमध्ये वाढली होती. रामटेकचे ठाणेदार आसाराम शेट्ये यांना माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून देहव्यापार सुरु असल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली.
रत्नागिरीतील तरूणीचा सहभाग – रत्नागिरीच्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तिची रवानगी नागपुरातील महिला सुधारगृहात करण्यात आली. ती तरुणी पूर्वी मुंबईत एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटशी जोडली गेली होती. रत्नागिरीतील उच्चशिक्षित अनेक तरूणी या रॅकेटमध्ये असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. सापडलेल्या तरूणीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
उच्चशिक्षित तरूणी – रत्नागिरीतील पीडित तरुणीने अभियांत्रिकीची पदवी घेतली असून ती मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच देहव्यापाराशी जोडली गेली होती. तिला नागपुरात देहव्यापार करण्यासाठी बोलावले होते. हॉटेलम ालक आणि आणखी एक आरोपी एका ग्राहकाकडून १० ते १५ हजार रुपये घेत होते. मात्र, पीडित तरुणीला केवळ एक हजार रुपये देऊन तिचे आर्थिक शोषण करीत होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान रत्नागिरीतील अन्य काही तरूणींचाही या रॅकेटमध्ये सहभाग असावा असा पोलीसांचा कयास असून त्यादृष्टीने या तरूणीची चौकशी सुरू आहे.