मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते दिले जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर खातेवाटपाबाबत विविध प्रसारमाध्यमांकडून अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अखेर भाष्य केले आहे. ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला देऊ केला आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं. मी काँग्रेस पक्षाचं चिन्हं मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता. आज तो कायदा अस्तित्त्वात आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांना खातेवाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी गुगली टाकली. ‘खातेवाटप तर माध्यमांनीच करून टाकलं आहे. आता आमच्यासाठी खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही.