राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या जिल्हा पदाधिका-यांची बैठक नेत्यांची दमछाक करणारी ठरली. महिला आक्रमक होत त्यांनी घेतलेले आक्षेप यासह प्रमुख पदाधिकारीही संतापले. या साऱ्यांच्या नाकदुऱ्या काढताना जिल्हा नेत्यांच्या नाकीदम आला. ही बैठक वादळी ठरली. ज्येष्ठ नेत्यांना त्यांची समजूत काढण्याची वेळ आली अन् वादावर पडदा पडला. शहरातील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात सोमवारी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकारी संतापल्या. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महिलांना नेतृत्व संघी मिळण्यासाठी ठोस पावले उचलली. त्यांच्याच पुढाकाराने महिलांना राजकारणात आरक्षणाद्वारे संधी मिळू लागली.
आता मात्र त्यांच्याच पक्षात महिलांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. जिल्हा बैठक असताना बॅनरवर महिला जिल्हाध्यक्षांचा फोटो नसल्याने महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. जिल्हाभरातून आलेल्या काही प्रमुख पदाधिकारोही व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने आक्रमक झाले. चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी प्रास्ताविक केले. त्याचवेळी काही महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, सत्काराचा कार्यक्रम थांबवा आणि ही जिल्ह्याची बैठक आहे का अशी विचारणा करीत व्यासपीठावरील बॅनरवर महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांचा फोटो का नाही याचे उत्तर देण्याची मागणी केली. यावरून महिला जिल्हाध्यक्षा चव्हाण समर्थक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
महिलांचा अवमान झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. जिल्हा प्रभारी व पक्ष निरीक्षकांसमोरच महिला कार्यकर्त्यांनी संयोजकांना धारेवर धरले. अडरेकर यांनी यावर कठोर शब्दांत भूमिका स्पष्ट करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही काही महिला आक्रमक झाल्या. अखेर जिल्हा प्रभारी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, “काही गोष्टी नजरचुकीने होतात. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच प्रथम महिलांना सन्मान दिला. याची जाण आम्हाला आहे. यापुढे चुका सुधारल्या जातील. “यानंतर प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यात आला. पक्षीय संघटनेबाबत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कशी वाटचाल करावी, या बाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.