महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ खासदार अजितदादांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लवकरच हा राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपची ही खेळी असून त्यामाध्यमातून बिहारमधील नितिश कुमार आणि आंध्रप्रदेशमधील चंद्राबाबू नायडू या दोन पक्षांची ‘टिवटीव’ थांबविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. नितिश कुमार आणि चंद्राबाबू यांचे दबावाचे राजकारण थोपवत त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याच्या इराद्याने भाजपाकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. मात्र भाजपकडे स्वबळावर बहुमत नसल्याने त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू या दोघांच्या पाठींब्यावर हे सरकार अवलंबून आहे. अर्थात अन्यही छोटेछोटे मित्रपक्ष आहेत. मात्र या दोघांकडे अनुक्रमे १२ आणि १४ खासदार असल्याने त्यांचा अधिक दबाब सरकारवर आहे.
नितिश कुमारांचे इशारे – नितिश कुमार हे भाजपसह केंद्रात तसेच बिहारमध्येही सत्तेत सहभागी आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुका नजीक आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आपल्यालाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे यासाठी भाजपवर दबाव टाकला आहे. भाजपचे आमदार जास्त असूनही आत्ता जसे नितिश कुमारांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले तोच फॉर्म्युला निवडणुकीनंतरही कायम राहावा अशी त्यांची मागणी आहे. म ात्र भाजपला हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळेच नितिश कुमारांनी भाजपची साथ सोडण्याचें इशारे दिले आहेत. अर्थात अजूनही नितिश कुमार यांनी जाहीरपणे तसे कोणतेही विधान केले नसले तरी आपल्या १२ खासदारांच्या पाठबळावर ते मोदी सरकारवर दबाव टाकत आहेत.
शह देणारी खेळी – नितिश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार भाजपची साथ बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी सोडणार, त्याचा परिणाम केंद्र सरकावरही होणार अशा साऱ्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोदींना शह देण्यासाठी आणि आपले मुख्यमंत्रीपद्कायम ठेवण्यासाठी नितिश कुमार असे इशारे देत आहेत.
भाजपची तयारी – नितिश कुमार यांचे हे इशारे भाजपने गांभीर्याने घेतले आहेत. त्यांचे आणि आंध्रप्रदेशच्या चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पक्षाचे दबावाचे राजकारण कमी करण्यासाठी किंवा ‘आमच्या पाठींब्यावर आहात’ असा इशारा वेळोवेळी देत लावलेली टिवटीव थांबविण्यासाठी भाजपने आता महाराष्ट्रातील आपल्या मित्रपक्षाला सोबत घेतले असून त्यामाध्यमातून हालचाली सुरू केल्या आहेत.
शरद पवारांचे खासदार संपर्कात ? – भाजपने आता यासाठी एनडीएतील आपला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मदत घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या पक्षातील ८ खासदारांना अजित पवारांच्या पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते अजित पवारांच्या पक्षात आले की स्वाभाविकपणे एनडीएमध्ये येतील आणि एनडीएचे लोकसभेतील संख्याबळ वाढेल. अजित पवार यांच्या पक्षाचा सध्या लोकसभेत एकमेव खासदार आहे. तर शरद पवारांच्या पक्षाचे १० खासदार आहेत.
अजित पवारांचे प्रयत्न – २ जुलै २०२२ रोजी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि एनडीएमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ते सामील झाले. तेव्हापासून अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवार यांना आपल्यासोबत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आजवर वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले आहेत. आता अजित पवारांना मदतीला घेवून शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात आणण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
८ खासदार वाटेवर? – शरद पवार यांच्या १० पैकी ८ खासदार हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते एनडीएच्या वाटेवर म्हणजेच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. हे खासदार अजित पवारांसोबत आल्यानंतर केंद्रात त्यांच्यापैकी किमान २ खासदारांन मंत्रीपद दिले जाईल. लवकरच हा नवा राजकीय भूकंप घडू शकतो अशी राजकीय सूत्रांची माहिती आहे.
दोन मतप्रवाह ? – तसेही विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव स्विकारावा लागल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षातील अनेकांचे मत भाजपसोबत एनडीएमध्ये जावे असे आहे. मात्र त्याचबरोबर काही जणांचे मत भाजपसोबत थेट न जाता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून एकत्रितरित्या एनडीएमध्ये जावे असेही आहे. आता यातील नेमके काय होते याविषयी उलटसुलट चर्चा सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची महत्वाची बैठक मुंबईत बुधवारी आणि गुरूवारी अशी दोन दिवस बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.