राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये घुसखोरी करून मासेमारी करणारी मलपी कर्नाटकची नौका थरारक पाठलागानंतर मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने पकडली. गस्ती पथकावर हल्ला करण्याच्या तयारीतही मलपी नौकावाले होते; परंतु स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने हा प्रकार टळला. मत्स्य विभाग आता या घुसखोरांना अद्दल घडवण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या नौकेवर ८५ हजारांची मासळी सापडली असून, त्यांच्यावर ८ लाखांची दंडात्मक कारवाई होणार आहे. प्रथमच मत्स्य विभाग ती मलपी बोट जप्त करण्याच्या तयारीत आहे. दोन दिवसांपूर्वीच मत्स्य विभागाच्या गस्ती पथकाने मलपी बोटीचा पाठलाग करून ती पकडली होती. यावर सात खलाशी होते. स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांनी गस्ती नौकेला मदत करून घुसखोरांना पकडले. घुसखोरांची एवढी मजल वाढल्यामुळे मत्स्य विभागाने त्यांना कायद्याने अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
सध्या ही नौका मत्स्य विभागाने ताब्यात ठेवली आहे. तसेच सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गस्ती पथकाने समुद्रात एलईडी लाईट पुरवणारी बोट पकडली आहे. यावर मोठे जनरेटर, हजार, ८०० वॅटचे हंडी व एलईडी बल्बसह खलाशी, तांडेल यांना पकडून हा गुन्हा मत्स्य विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. २० वावाच्या बाहेर हे लोक हा व्यवसाय करतात; परंतु आत १० वावांमध्ये ते एलईडी पुरवण्यासाठी आले असताना त्यांच्यावर ही कारवाई झाली.
ड्रोनमुळे अनेक नौकांवर चाप – शासनाने राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये घुसखोरी आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे गस्त सुरू केली आहे. याचा चांगलाच धसका बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांनी घेतला आहे. मत्स्य विभागाला आणखी दोन नौका ड्रोनमध्ये कॅप्चर झाल्या असून, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांनी दिली.
…त्या बोटीची नोंदणी मुंबईची – कस्टम विभागाने पकडलेल्या एलईडी पुरविणाऱ्या नौकेची अधिकृत नोंदणी असल्याची माहिती मत्स्य विभागाने दिली. कस्टम विभागाने आमच्याकडून माहिती न घेता अशा प्रकारे बोगस नोंदणी असल्याचा संशय व्यक्त करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. मुंबईतील बोट मालक असून, त्याने हर्णैमध्ये ही बोट चालवली जात असल्याचे सांगितले आहे.