28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeRatnagiriदमदार पावसाने शीळ धरण हाउसफुल्ल

दमदार पावसाने शीळ धरण हाउसफुल्ल

शहरवासीयांच्या पाण्याची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे. सकाळी साडेसातला शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले. पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी धरणावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी धरणाची पातळी १२०.३३ मीटर झाली असून, प्रतिसेकंद १.०१ घनमीटर इतका विसर्ग होत आहे. रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यात गेल्या एप्रिलच्या १५ तारखेपासून कपात केली होती. बिपरजोय चक्रीवादळामुळे मान्सून लांबण्याची भीती असल्याने मुख्याधिकारी बाबर आणि अभियंता भोईर यांनी जोखीम पत्करत पाणी पुरवठ्यात कपात केली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची क्षमता ४.३७१ द.ल.घ.मी. इतकी आहे. ज्यावेळी पाणी कपातीचे नियोजन झाले, तेव्हा धरणात १.८०० द.ल.घ.मी. जलसाठा होता. पाणी कपातीच्या नियोजनानुसार हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणारा होता. पावसाळा जसा लांबला गेला तशी पाणीसमस्या वाढत गेली होती. गेल्या वर्षी १० जूनला पाऊस सुरू झाला आणि पुढील आठवड्याच्या आतच शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. परंतू यावर्षी पाऊस लांबल्याने पाणीपुरठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. परंतु आता चिंता संपली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण साडेसात वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडुन वाहू लागले आहे. पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळावे – पावसामुळे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी धरणात जमा झाले. मातीयुक्त पाणी असल्याने त्याचा रंगही बदलला आहे. त्यामुळे पालिकेने शहरवासीयांच्या आरोग्याच्या हितासाठी जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी शहरवासीयांना द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

RELATED ARTICLES

Most Popular