रत्नागिरीकरांच्या अपेक्षित विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा संकल्प नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनीं पदग्रहण सोहळ्यात व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि शुभेच्छांच्या वर्षावात नगराध्यक्ष दालनात सोमवारी सकाळी १० वाजता त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळाला. रत्नागिरीचा आलेख चढता ठेवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सोयींचा प्रश्न प्राधान्याने सोडवू, अशा भावना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केल्या. शहराला नावारूपाला आणण्याच्या प्रयत्नांत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे अपेक्षित सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांच्या पिताश्री उद्योजक आण्णा सामंत यांनी दिली. लोकप्रतिनिधींच्या पाठीशी प्रशासन ठाम उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पदग्रहण सोहळ्याला शिवसेना-भाजप युतीचे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवकही उपस्थित होते. महिलावर्गाने दिलेल्या उत्स्फूर्त शुभेच्छांमुळे सभागृहातील वातावरण आनंदी आणि भावनिक दोन्ही झाले. यावेळी सर्व नगरसेवकांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार झाला आणि नंतर नगरसेवकांनी संयुक्तपणे नगराध्यक्षांचा सन्मान करून सहकार्याची ग्वाही दिली. सभागृह भगव्या रंगात न्हाऊन निघाल्याचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. नगरपरिषदेचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी प्रास्ताविकात प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले. शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी पारदर्शक, सर्वांगीण आणि जनतेच्या हिताचा विकास करण्यासाठी पाऊल न पाऊल साथ देण्याची भूमिका मांडली.
१३ जानेवारी २०२२ पासून प्रशासकीय ताब्यात असलेला नगरपरिषदेचा कारभार आता पुन्हा लोकप्रतिनिधीकडे आला असून, पदग्रहणाने रत्नागिरीच्या विकासाला नवे वळण मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष सुर्वे च्या शब्दांत शहरासाठीचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता. यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेवक सौरभ मलुष्टे, प्रीती सुर्वे, निमेश नायर, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, पूजा पवार, सौ. सायली पाटील, यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते. शिवसैनिकही मोठ्या संख्येने आले होते. भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, नगरसेवक राजू तोडणकर समीर तिवरेकर यांच्यासह विरोधीपक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये आणि अमित विलणकर (उबाठा) हे देखील उपस्थित होते.

