26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriशिंदेंचे ३, ठाकरेंचे ४ उमेदवार जाहीर, सामंत बंधूंसह योगेश कदमांना संधी

शिंदेंचे ३, ठाकरेंचे ४ उमेदवार जाहीर, सामंत बंधूंसह योगेश कदमांना संधी

शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झालेले नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेने रत्नागिरीतून विद्यमान आमदार उदय सामंत यांच्यासह त्यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांना लांजा-राजापूर मतदारसंघातून आणि खेड-दापोलीतून आमदार योगेश कदम यांची नावे जाहीर केली आहेत. ठाकरे सेनेकडून रत्नागिरी जिल्ह्यातील चार मतदारसंघांतील नावे जाहीर केली आहेत. त्यात रत्नागिरीमधून सुरेंद्र उर्फ बाळ माने, राजापुरातून आमदार राजन साळवी, गुहागरमधून आमदार भास्कर जाधव, दापोलीतून संजय कदम यांचा समावेश आहे. शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता. २२) उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रत्नागिरी विधानसभेवर वरचष्मा असलेले आमदार उदय सामंत यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून मोठ्या फरकाने विजय मिळविला होता.

त्यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते. ते रत्नागिरीमधून पाचव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्याकडून ठाकरे सेनेकडून भाजपामधून आलेल्या सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली गेली आहे. लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघामधून पालकमंत्री सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी दिली आहे. ते प्रथमच निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. जनतेमधून निवडणूक लढवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. सध्या त्यांच्याकडे सिंधुरत्न योजनेचे सदस्यपद आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे सेनेकडून विद्यमान आमदार राजन साळवी हे उमेदवार आहेत. साळवी हे पाचव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. ही लढत चुरशीची होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दापोली-खेड-मंडणगड या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेकडून योगेश कदम यांना संधी दिली आहे. २०१९ मध्ये त्यांनी प्रथम निवडणूक लढविली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा ते काय चमत्कार करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी शिंदे सेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीन मतदारसंघांतून आघाडी-युतीचे उमेदवार जाहीर झालेले असतानाच गुहागरमध्ये महायुतीचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे सेनेचे भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, युतीचा निर्णय प्रलंबित आहे. शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झालेले नाही. त्यामुळे जाधवांच्या विरोधात उमेदवार कोण याबाबत उत्सुकताच लागलेली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular