महाराष्ट्र व मच्छिमारांना धक्का देणारी गोव्यातील मोठी माहिती समोर आली असून त्यामुळे मच्छिमार बांधव विलक्षण चिंताक्रांत झाले आहेत.
चिनी फॅक्टरी बोटींचा हैदोस – नारळी पौर्णिमेपासून कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचा हंगाम सुरु होतो, त्यानुसार यावर्षीही तो सुरु झाला. होऊनही मच्छिमारांना फारसे काही गवसले नाही. महिनाभर सततचा पाऊस व वादळी हवामान यामुळे स्थानिक मच्छिमारांना समुद्रात जावून मच्छिमारी करणे शक्य झाले नाही. या महिनाभरात चिनी मच्छिमार बोटींनी जोरदार हात मारला. सुमारे ५०० ते ६०० चिनी अवाढव्य ‘फॅक्टरी बोटी’ कोकणच्या समुद्रात मागील महिनाभर जणू काही हैदोस घालत आहेत.
समुद्राची भयावह लूट ! – चीनच्या या अवाढव्य ‘फॅक्टरी बोटी’ कोकणच्या खोल समुद्रात महिनाभर मच्छिमारी करीत असल्याची माहिती मच्छिमार सांगतात. भारताच्या सागरी हद्दीत २०० सागरी नॉटीकल मैलपर्यंत परदेशी बोटींना मच्छिमारी करण्यास बंदी आहे. तरीही या सुमारे १०० मीटर लांबीच्या अवाढव्य फॅक्टरी बोटी सागरी हद्दीत आतपर्यंत घुसखोरी करतात आणि खुलेआम मच्छिमारी करतात. या चिनी अवाढव्य बोटींची हजारो टनांची साठवणूक क्षमता असल्याने त्या कोकण किनाऱ्यावरील समुद्राची लूट करत आहेत.
.. तरीही कारवाई नाही ! – या चिनी अवाढव्य ‘फॅक्टरी बोटी’ अशा बेमालूमपणे कोकणच्या समुद्रात मच्छिमारी करतात की त्यांना ओळखणे अनेकदा नौदलाला देखील कठीण होते. अनेकदा या चिनी जहाजांना रंगेहात पकडल्यानंतरही त्यांना नेमकी कोणती कारणे देत सोडून दिले जाते हे देखील न उमगलेलं कोडे असल्याचे जाणकार मच्छिमार सांगतात. घुसखोरी करणाऱ्या या बोटी ‘व्हेसल ट्रॅकर’वर दिसत असल्यातरी त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही अशी खंत जाणकार मच्छिमारांनी बोलून दाखविली.
स्थानिक मच्छिमारांचे नुकसान – महाराष्ट्राला सुमारे ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. यामध्ये गोव्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यातील किनारपट्टीचा समावेश होतो. सर्वाधिक लांबीचा किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला असून सर्वात कमी लांबीचा किनारा मुंबईला लाभला आहे. या बोटी स्थलांतरीत माशांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.
स्थानिक मच्छिमार हवालदिल – या चिनी अवाढव्य ‘फॅक्टरी आंध्र प्रदेश, बोटीं’ शिवाय तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गुजरात या परराज्यातूनही आलेल्या मच्छिमारी नौका कोकणच्या समुद्रात मागील महिनाभर खुलेआम मच्छिमारी करीत आहेत. परराज्यातील ४२७ हॉर्स पॉवर पर्यंतच्या या बोटी आणि चीनच्या हजारो टन क्षमतेच्या ‘फॅक्टरी बोटीं’नी कोकण किनारपट्टीची मागील महिनाभर लुट चालविली असल्याची चर्चा आता साऱ्या कोकणात जोरदारपणे सुरु झाली आहे. आधीच महिनाभर खराब हवामानामुळे स्थानिक मच्छिमारी ठप्प असताना समुद्रातील मासळी परदेशी व परप्रांतीय नौका ओरबाडून नेत असल्याने स्थानिक मच्छिमार हवालदिल झाले आहेत.