तुमचे स्मार्ट मीटर चुलीत घाला, आम्हाला असले प्रिपेड मिटर नकोयत, अदानी तुमचा कोण लागतो? असा सवाल करीत रत्नागिरीत स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराब घालत जोरदार निदर्शने केली. महावितरण कार्यालयातील अदानीचे कार्यालय तात्काळ हटवा अन्यथा काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, प्रसाद सावंत, आदित्य, तसेच शेकडो शिवसैनिक महावितरणच्या कार्यालयात धडकले. कार्यकर्त्यांनी स्म ार्ट मीटरसंदर्भात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेत, हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली.
स्मार्ट मीटरबाबत अस्वस्थता – महावितरणकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला जात आहे. परंतु, अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाढीव वीजबिल, चुकीच्या गणनामुळे होणारे नुकसान आणि ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार यामुळे स्मार्ट मीटरला मोठा विरोध आहे.
शिवसैनिकांचा घेराव – शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत, जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा दिला. जर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी दिला.
अधिकाऱ्यांना धारेवर धरले – यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेनेचे प्रसाद सावंत, विभागप्रमुख विजय देसाई, संजय पुनसकर, मयुरेश्वर पाटील, अमित खडसोडे, उत्तम मोरे, सलील डाफळे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पुर्वीचेच मीटर हवेत – यावेळी संतप्त शिवसैनिकांनी स्मार्ट मीटर आम्हाला नकोत, पुर्वीचेच मीटर हवेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. तसेच ज्यापद्धतीने मोबाईलचे रिचार्ज संपते त्याप्रमाणे विजेचे रिचार्ज संपले की वीजपुरवठा खंडीत होणार, त्यामुळे स्म ार्ट मीटरला आमचा विरोध असल्याचे शिवसैनिकांनी ठासून सांगितले.
महावितरणची भूमिका – या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. स्मार्ट मीटरबाबत सरकारच्या निर्दे शानुसारच पुढील प्रक्रिया केली जात आहे. मात्र, नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्मार्ट मीटरचा विषय ऐरणीवर आला असून आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.