शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील चित्र मांडले. चिपळुणात आपल्या पक्षाचा आणि हक्काचा आमदार असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विनोद झगडे यांनी तालुका प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केलेल्या कामाचा आढावा मांडला. तसेच कार्यकर्त्यांची सध्याची मानसिकता त्यांनी स्पष्ट केली. चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले, महायुतीचा उमेदवार निवडून आल्याने हा मतदारसंघ आमदारांना आंदण दिल्या सारखेच वाटत होते.
आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम सुरू आहे. आम्ही हे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले होते, पण आता तुम्ही असल्याने आम्हाला दिलासा मिळाला. आता अधिक जोमाने काम करून चिपळूणवर भगवा फडकवू. महिला संघटक मानसी भोसले यांनी महिलांच्या व्यथा मांडल्या. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी या तालुक्यात आमदार नसल्याने शिथिलता आली होती. आमदार आमच्या कार्यकर्त्यांना विचारात घेत नाहीत पण आता तेच दुसऱ्या पक्षात गेल्याने प्रश्नच नाही. मध्यंतरी माझा फोटो छापून मी इच्छूक असल्याची बातमी आली होती. पण त्याला काही अर्थ नाही. राजयोग असावा लागतो.
तो राजयोग भास्कर जाधव यांच्याकडे आहे असे सुचविले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर महाराष्ट्रातील जबाबदारी यांच्यावर आहे. आपल्या जिल्ह्यातील स्थिती माहीत असावी असे वाटल्याने ते काम करीत आहेत. या जिल्ह्यातील पाचही आमदार शिवसेनेचे असावेत असे त्यांना वाटते. शिवसैनिक हा अंगार आहे, पण त्यावर साचलेली राख फुंकर घालून बाजूला करण्याचे काम भास्करर जाधव यांनी केले. आता हा निखारा हा अधिक तेजाने चमकेल असे सांगितले.