गेल्या काही दिवसांपासून शहरालगतच्या खेर्डी येथे स्मार्ट वीजमीटर बसवण्यात येत आहे. या नवीन मीटरनंतर ग्राहकांची वीजबिले वाढल्याच्या तक्रारी आहेत तसेच नागरिकांची संमती नसतानाही मीटर बसवले जातात. यावरून शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने खेर्डीतील महावितरण कार्यालयावर धडक दिली. सक्तीने नवीन मीटर बसवू नयेत; अन्यथा लोकांचा उद्रेक होईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते म्हणाले, खेर्डी गाव आणि परिसरात अलीकडेच प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात आले. नवीन मीटरमुळे घरगुती ग्राहकांची बिले वाढली आहेत. मीटरमध्ये बसवलेल्या सिमकार्ड प्रणालीत तांत्रिक अडचणी असल्याने चुकीचे युनिट दाखवले जाते, त्याचा परिणाम चुकीच्या बिलावर होतो. सरकारने वीज युनिटचे दर वाढवल्याने बिलात आणखी वाढ झाली आहे. मीटरची किंमत व देखभाल खर्च पूर्वीच्या मीटरपेक्षा खूप जास्त आहे.
जर मीटर जळाले अथवा बिघडले, तर नवीन मीटरचे शुल्क ग्राहकांकडून घेतले जाते, जे परवडणारे नाही. यामुळे लोकांचा नवीन मीटरला विरोध होत आहे. यापुढे गावात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवता कामा नयेत. ग्राहकांच्या हितासाठी या मीटर बसवण्याच्या कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, स्मार्ट मीटर बदलून पुन्हा जुने मीटर लावण्यात यावे अन्यथा आम्ही स्वतः मीटर बदलून जुने मीटर लावणार. वेळ पडली, तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, त्यासाठी आम्ही तयार आहेत. निवेदन देताना शिवसेना विभागप्रमुख विजय शिर्के, दत्ताराम पवार, शशिकांत कासार, सुबोध सावंतदेसाई, राहुल भोसले, समीर कदम, कमाल बंदरकर, मुसा चौगुले, बाळशेठ दाभोलकर, विराज खताते, बाबा सुर्वे आदी उपस्थित होते.
चिपळुणात १८ ला संयुक्त बैठक – चिपळूण शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये महावितरण कंपनी आणि पालिका प्रशासनाबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शहरातील नागरिक, व्यापारी सोशल मीडियावरून थेट प्रशासनावर टीका करत नाराजी व्यक्त करत आहेत. त्याची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी १८ सप्टेंबरला संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक १८ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता नगरपालिकेसमोरील स्वा. सावरकर सभागृहात होणार आहे