26.2 C
Ratnagiri
Monday, October 28, 2024
HomeSindhudurgनिलेश राणेंना शिवसेनेत पाठविण्याची 'खेळी' कोणाची? दोन नेत्याने 'गेम' केल्याची चर्चा 

निलेश राणेंना शिवसेनेत पाठविण्याची ‘खेळी’ कोणाची? दोन नेत्याने ‘गेम’ केल्याची चर्चा 

कुडाळ, मालवण 'विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे वैभव नाईक विरुद्ध शिंदे सेनेचे निलेश राणे हे निवडणूक लढवीत आहेत.

कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघातून भूतपूर्व खा. श्री. निलेश राणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी भाजपचा त्याग करुन त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून ते आता या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी भाजपचा त्याग करण्याची काय आवश्यकता होती? या मतदार संघात भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद फार मोठी आहे असे वाटते का? असे खणखणीत सवाल आता मालवणी मुलुखातून विचारले जाऊ लागले आहेत. भाजपाच्या एका ‘महान कर्तबगार’ नेत्याने निलेश राणेंना शिवसेनेत पाठविण्याचा ‘गेम’ केला की काय अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. कुडाळ, मालवण मतदार संघात नेमके कोणते ‘राजकारण’ घडले असावे याबाबत आता मालवणी मुलुखात जोरदार गजाली रंगत आहेत.

कुडाळात काय होतला? – मालवणी मुलूखातल्या विधानसभेच्या तिन्ही तगडे उमेदवार उभे मतदारसंघात असून या रोमहर्षक लढतीत कुडाळ, मालवण मतदारसंघाकडे सर्वांचे जास्त लक्ष लागले आहे. नाक्या नाक्यावर, बाजारपेठांत आणि हॉटेलच्या बाकड्यांवर बसून चमचमीत गरम गरम मासळी आणि सागोतीचे जेवण आणि खमंग सोलकढीचे भुरके मारीत मारीत कुडाळात काय होतला? या चर्चेला वेग आला आहे.

सेनेची ताकद ती काय ? – कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद ती काय ? असा सवाल सर्वसाधारण लोकांना पडला असून वडील खासदार आणि भाऊ आमदार असलेल्या व देशपातळीवर सत्ता असलेल्यां पक्षाचा निलेश राणे यांना त्याग का करावा लागला? की त्यांनी मनापासून सेनेत प्रवेश केला? याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

काँटे की टक्कर – कुडाळ, मालवण ‘विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे वैभव नाईक विरुद्ध शिंदे सेनेचे निलेश राणे हे निवडणूक लढवीत आहेत. निलेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी राणे यांनी कंबर कसली आहे. तर शिवसेनेचे वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या ठिकाणी काँटे की टक्कर होईल यात शंका नाही.

भाजपाची मोठी ताकद – कुडाळ, मालवणमध्ये भाजपाची मोठी ताकद असून निलेश राणे हे गेली ४,५ वर्षे या मतदारसंघात अहोरात्र पक्ष बांधणीचे काम करीत आहेत. त्याचे फळ म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत खा. नारायण राणे यांना या मतदार संघातून २७ हजारचं मताधिक्य मिळाले आणि राणेंचा विजय सुकर झाला. त्यामुळे निलेश राणे यांचे मनोबल वाढल्याने त्यांनी कुडाळातून भाजपाकडे तिकीट मागितलेले होते.

‘त्या’ नेत्याची करामत ? – निलेश राणे यांची वाढलेली पक्षातील ताकद भाजपमधीलच कुणा ‘महान कर्तबगार’ नेत्याला खटकली असावी म्हणून उमेदवारीची ‘खाट’ टाकण्याचे उपद्व्याप त्या महोदयांनी केले की काय? असा प्रश्न अवघ्या मालवणी मुलुखात गावोगाव जनतेतील चर्चेत विचारला जाऊ लागला असून त्याच्या चविष्ट गजाली रंगत आहेत.

भाजपचे तिकीट का नाही? – निलेश राणे यांना भाजपने तिकीट द्यायला हवे होते. घराणेशाहीचा मुद्दा आड आला असेही म्हणता येणार नाही. कारण भाजपने राज्यातील १० ते १२ घराण्यातील मुला बाळांना आणि नातलगांना उमेदवारी देऊन घराणेशाहीचा मुद्दा गौण ठरविला आहे. त्यामुळे कथित घराणेशाहीचा सांगण्यात येणारा मुद्दा हा निव्वळ ‘कांगावा’ असावा असे आता सर्रास बोलले जात आहे.

गोड बोलून ‘गेम’? – दुसरे म्हणजे निलेश राणे यांना धनुष्य बाणाच्या चिन्हाचा लाभ उठवायचा असेल म्हणून ते शिवसेनेत गेले असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात. मग लोकसभेच्या निवडणुकीत कुडाळ, मालवणमधील मतदारांनी खा. नारायण राणे यांच्या ‘कमळ’ या निशाणीला मते देऊन २७ हजारांचे घसघशीत मताधिक्य दिलेले आहे. मग शिवसेनेत प्रवेश करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राजीनाम्याची आठवण – माजी खासदार असलेल्या निलेश राणे यांनी राजकारणातून अचानक निवृत्ती घेत असल्याची घोषणा गेल्या वर्षीच्या दसऱ्याच्या दिवशी केली होती. पालकमंत्र्यांच्या एकाकी कारभारामुळे निलेश राणेंनी हा निर्णय घेतल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. त्यातून कोकणात भाजपा कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

‘त्या’ घटनेची याद – त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला आणि त्यानंतर श्री. निलेश राणे यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता तसेच तन मन आणि धन लावून मतदारसंघात काम सुरु केले होते. या घटनेची याद आजही मालवणी मुलखात गावोगाव सुरु असलेल्या गजालींमध्ये आवर्जून काढली जात आहे.

गजानींनी खाल्लो घोव ! – कुडाळ, मालवण मतदारसंघातील उमेदवार श्री. निलेश राणे हे शिवसेनेत का गेले? त्यात भाजपच्या कुणा ‘महान कर्तबगार’ नेत्याचा हात आहे की काय ? त्याने दिल्लीश्वरांचे कान फुंकून श्री. निलेश राणे यांना पक्षाबाहेर काढण्याचा ‘गेम’ केला की काय? याची जोरदार चर्चा आता मालवणी मुलूखात सुरु झाली असून गजालींनी घोव खाल्यासारखी गत झाली आहे!

RELATED ARTICLES

Most Popular