आज १९ फेब्रुवारी शिवजयंती. देशापरदेशात सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला यामध्ये पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त दिसत होता. मारुती मंदिर ते बाजारपेठ यादरम्यान हा रूट मार्च करण्यात आला. शिवजयंतीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडून येऊ नये यासाठी हा रूट मार्च करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात मारुतीमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवप्रेमींनी गर्दी केली असून सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला आहे. टीआरपी ते मारुती मंदिर अशी मशाल घेऊन दुचाकी वरुन, चालत सुद्धा सर्व प्रेमी येत आहे. अनेक शिवप्रेमी चारचाकी वाहनांनी या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील वातावरण भगवेमय झालेले दिसून येत आहे.
राज्य सरकारकडून शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संभाजीराजे छत्रपती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला आहे.
या भव्य सोहळ्यात अनेक शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली आहे. यानंतर पोलीस पथकाकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्रातील पारंपारिक वाद्य ढोल-ताशा आणि लेझीमची प्रात्यक्षिके दाखवत राजांना मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्या निमित्त शिवनेरी गडावर आकर्षक रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, गडाचा संपूर्ण परिसर जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे.