राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरविण्यासाठी जगभरातून अनेक शिवप्रेमींनी विरोध दर्शविल्यावर, राष्ट्रपतींनी सुद्धा जनतेचे मन न मोडता रोपवे मार्गे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला पोहोचले.
ज्यावेळी रायगडला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली, यावेळी त्यांना ‘शिवकालीन होन’ची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. त्याकाळचे होन म्हणजे आजच्या काळातील भारताचा रुपया. रुपया हा जसा देशाच्या स्वाभिमानाचं आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे, त्याप्रमाणे शिवराई होन हे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. जाणून घेऊया थोडक्यात हे होन म्हणजे नक्की काय आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी प्रचलित केलेल्या सोन्याच्या नाण्याला ‘शिवराई होन’ असे म्हणतात. त्याकाळी सर्व बाजारपेठेवर मुघल, आदिलशाही, कुतुबशाही व अशा अनेक चलनांचे वर्चस्व असतांना त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या दबावाला बळी न पडता, त्यांना झुगारुन देवनागरी लिपीमधील पाडलेली स्वत:ची नाणी चलनात आणली. सोबतच हेनरी ऑक्झिडेन याने राज्याभिषेकावेळी केलेल्या इंग्रजांची नाणी स्वराज्यामध्ये चालावी या मागणीला शिवाजी महाराजांनी नकार देऊन आमच्या राज्यात फक्त आमची नाणी चालतील असे ठणकावून सांगितले होते.
नाणी अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशुतोष पाटील यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, शिवाजी महाराजांच्या ‘शिवराई होन’ या नाण्यावर पुढील बाजूला बिंदूमय वर्तुळात देवनागरी लिपीमध्ये तीन ओळीत ‘श्री राजा शिव’ आणि मागील बाजूस दोन ओळीमध्ये बिंदूमय वर्तुळात ‘छत्र पति’ असे लिहलेले आहे.
शिवकाळात रायगडावरील टांकसाळीत ‘होन’ पाडण्यात येत होते. होन आज दुर्मीळ बनले आहे. तो मिळणे केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशवासीयांसाठी भाग्याची बाब आहे. हा केवळ होन नसून प्रत्येक मराठी माणसाकरिता एक अभिमान आहे. आज भारतात केवळ छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई व राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली येथे ‘शिवराई होन’ सार्वजनिकरित्या पाहता येतो. आजच्या काळात होन अतिशय दुर्मिळ झालं असताना रायगड किल्ल्यावरचे औकिरकर कुटुंबिय शिवरायांनी दिलेले होन जबाबदारीने सांभाळत आहेत.